आता राज्यपालांना कोल्हापुरी जोडे दाखविण्याची वेळ : उद्धव ठाकरे | पुढारी

आता राज्यपालांना कोल्हापुरी जोडे दाखविण्याची वेळ : उद्धव ठाकरे

पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावर सर्वत्र टीकेची झोड उठविण्यात येत आहे. राज्यभरातून त्यांच्या विधानावर संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही आज (दि. ३०) राज्यपाल कोश्यारी यांच्या विधानाचा खरपूस समाचार घेत त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल चढवला. महाराष्ट्राचे मीठ खाऊन आग कशी लावता, असा सवाल करत आता राज्यपालांना कोल्हापुरी जोडे दाखविण्याची वेळ आली आहे, असा निशाणा ठाकरे यांनी शिवसेना भवनात आयोजित पत्रकार परिषदेत लगावला.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari) यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात वादग्रस्त वक्तव्य केले आहे. गुजराती आणि राजस्थानींना महाराष्ट्रातून, विशेषतः मुंबई आणि ठाण्यातून काढून टाकले तर इथे एक पैसाही शिल्लक राहणार नाही. तसेच मुंबई देशाची आर्थिक राजधानी राहू शकणार नाही, असा दावा भगतसिंह कोश्यारी यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यावर मनसे, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस आदी पक्षांनी जोरदार आक्षेप घेतला आहे.

या पत्रकार परिषदेत ठाकरे यांनी राज्यपाल कोश्यारी यांच्या जुन्या वादग्रस्त विधानाची आठवण करून देत त्यांच्यावर जोरदार प्रहार केला. ते म्हणाले की, राज्यपालांच्या खुर्चीत बसणाऱ्या व्यक्तीने खुर्चीचा मान राखणे आवश्यक आहे. परंतु महाराष्ट्राच्या नशिबी असे लोक का येत आहेत, असा सवाल करत राज्यपालांकडून असे विधान अनावधानाने आलेले नाही. त्यांना कोण स्क्रिप्ट लिहून देत आहे, हे माहीत नाही. मराठी माणसांनी रक्त सांडून मुंबई मिळवली आहे. त्यांच्या त्यागाचा, संघर्षाचा अवमान होता कामा नये. परंतु, राज्यपालांकडून मराठी माणसांचा वारंवार अपमान केला जात आहे. आता त्यांना घरी पाठवायचे की तुरुंगात पाठवायचे याचा विचार करण्याची वेळ आली आहे.

मराठी अस्मितेचा आणि महाराष्ट्रात राहून मराठी माणसांचा अवमान केला जात आहे. जाती, पाती, धर्म, हिंदूमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे. मुंबई तोडायचे हे विधान त्यांच्या तोंडातून आले आहे की, त्यांच्या वतीने म्हणवून घेतले आहे, हे बघणे गरजेचे आहे. कारण दिल्लीत बसलेल्यांचा जीव मुंबईत आहे. राज्यपालांचे पार्सल जेथून आले आहे, तेथेत परत पाठवावे लागेल, असे सांगून राज्यपालांनी केलेल्या स्पष्टीकरणातून समाधान झालेले नाही. राज्यपालांनी मराठी माणसांची माफी मागावी, अशी मागणी ठाकरे यांनी लावून धरली.

हेही वाचलंत का ? 

Back to top button