दिल्ली वाऱ्या आणि फुटीरांमधील मतभेद मिटविण्यात सरकार व्यस्त; जयंत पाटील यांचा आरोप | पुढारी

दिल्ली वाऱ्या आणि फुटीरांमधील मतभेद मिटविण्यात सरकार व्यस्त; जयंत पाटील यांचा आरोप

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : दिल्लीच्या वाऱ्या करणे, फुटीरांमधील मतभेद मिटविणे व त्यांच्या समजूती घालणे यामध्ये सरकार व्यस्त आहे. तसेच उपमुख्यमंत्री पद मिळाल्याने भाजपमधील एक गट अस्वस्थ आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षणाकडे लक्ष देण्यासाठी सरकारकडे वेळ नाही, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला.

एकनाथ शिंदे यांचे सरकार येऊन २५ पेक्षा जास्त दिवस झाले तरी राज्याला मंत्रिमंडळ नाही, याबाबत जयंत पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. महाविकास आघाडीने स्थापन केलेल्या बांठिया आयोगाने सुप्रीम कोर्टात अहवाल सादर केला. या अहवालामुळे ओबीसींना आरक्षण मिळाले. मात्र सरकारला त्यावर लक्ष देता आले नाही. सरकार दिल्ली वाऱ्यांमध्ये व्यस्त असल्यामुळे दुर्लक्ष केल्याने ९२ नगरपालिकांमध्ये आरक्षण मिळाले नाही. वर्धा, नांदेड, यवतमाळ यासह महाराष्ट्रातील अनेक भागांत पूरपरिस्थिती आहे. पण पालकमंत्री नसल्याने तिथे ठामपणे कोणी उभे राहत नाही. मदतकार्यावर कोणतेही प्रशासकीय नियंत्रण नसल्याने मदतकार्य नीट होत नाही. अनेकांचे संसार उद्‍ध्‍वस्‍त झाले  आहेत मात्र त्‍यांचे अश्रू पुसण्यासाठी कुणीही नाही, असेही पाटील यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा :

Back to top button