मुंबई : सीएसएमटी-पनवेल लोकलचा एक डब्बा रुळावरून घसरला; हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत (व्हिडिओ) | पुढारी

मुंबई : सीएसएमटी-पनवेल लोकलचा एक डब्बा रुळावरून घसरला; हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत (व्हिडिओ)

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : सीएसएमटी रेल्वे स्थानकात हार्बर मार्गावरील पनवेलच्या दिशेला जाणाऱ्या लोकलचा एक डब्बा रुळावरून खाली घसरल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. यामुळे हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. याचा फटका चाकरमान्यांना बसला आहे.

मंगळवारी सकाळी 9.39 ची सीएसएमटी तें पनवेल लोकल प्लॅटफॉर्म एक वर उभी होती. सिग्नल मिळाल्यानंतर लोकल पनवेलच्या दिशेने जाण्याऐवजी मागे गेली आणि बफरला जाऊन धडकली. त्यामुळे लोकलच्या चौथ्या डब्याची चाके रुळावरून खाली घसरली. या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही. परंतु हार्बर मार्गावरील वाहतूक मात्र विस्कळीत झाली. लोकल पुढे न जाता मागे कशी गेली, याची चौकशी केली जाणार आहे. प्रवाशाच्या सोयीसाठी प्लॅटफॉर्म 2 वरून वाहतूक सुरु ठेवण्यात आली असली तरी हार्बरचे वेळापत्रक मात्र कोलमडले आहे. हार्बर मार्गावरील प्रवाशांना मेन लाईनवरून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. तसेच घसरलेला डबा आणि लोकल रुळावरून बाजूला करण्याचे काम सुरु आहे.

अपघातात प्लॅटफॉर्मचे नुकसान

लोकलचे डबे रुळावरून एका बाजूला प्लॅटफॉर्म वर घसरले. त्यामुळे प्लॅटफॉमचे नुकसान झाले आहे. यामध्ये प्लॅटफॉर्मच्या लाद्या निघाल्या आहेत.

प्रवाशांचे हाल

प्लॅटफॉर्म एक बंद असल्याने सध्या फक्त प्लॅटफॉर दोन वरून वाहतूक सुरु आहे. यामुळे गाडयांचे बंचिंग झाले आहे. कुर्ला तें वडाळा दरम्यान लोकलच्या रांगा लागल्या आहेत. परिणामी प्रवासी लोकलमधून उतरून रुळावरून चालत जवळचे रेल्वे स्थानक गाठण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान गोरेगाव ते सीएसएमटी लोकल वडाळा पर्यंत धावत आहे.

Back to top button