Video : ‘माझीच माणसे दगाबाज निघाली, शस्त्रक्रियेनंतर गुंगीत असताना सरकार पाडण्याचा प्रयत्न’; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल | पुढारी

Video : 'माझीच माणसे दगाबाज निघाली, शस्त्रक्रियेनंतर गुंगीत असताना सरकार पाडण्याचा प्रयत्न'; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

मुंबई; पुढारी ऑनलाईन : महाराष्ट्रातील सत्तांतरानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’ला मुलाखत दिली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ठाकरेंची ही मुलाखत घेतली असून त्याचा पहिला भाग आज प्रसिद्ध करण्यात आला. त्यात उद्धव ठाकरेंनी राज्यातील सरकार कसे पाडले याबाबत भाष्य करत शिंदे गट आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. ‘सरकार गेले, मुख्यमंत्रीपद गेले याची खंत नाही; पण माझीच माणसे दगाबाज निघाली. मी इस्पितळात शस्त्रक्रियेनंतर गुंगीत असताना सरकार पाडण्याचे प्रयत्न झाले!” असा आरोप ठाकरे यांनी केला आहे.

सडलेली पानं झडताहेत. ज्यांना झाडाकडून सगळं काही मिळालं, सगळा रस मिळाला म्हणून त्यांचा टवटवीतपणा होता. ती पानं सगळं झाडाकडून घेऊनही ती गळून पडताहेत. आणि हे बघा, झाड कसं उघडंबोडपं झालंय असं दाखवायचा ते प्रयत्न करताहेत. पण दुसऱ्या दिवशी माळीबुवा येतो, ती पानगळ केराच्या टोपलीत घेतो आणि घेऊन जातो, असा टोला उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांना लगावला आहे.
त्यांना शिवसेना संपवायची आहे. जे शिवसेनेसोबत ठरवलं होतं अडीच -अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद…तेच तर तुम्ही आता केलंत आणि ते जर तेव्हा केलं असतं तर निदान पाच वर्षांत भारतीय जनता पक्षाला एकदा तरी अडीच वर्षाचं मुख्यमंत्रीपद मिळालं असतं… ही जी काही सोंगं ठोगं करतायत की आम्ही आम्ही शिवसेनेला मुख्यमंत्रीपद दिलं ती करावी लागली नसती आणि आता ते म्हणताहेत की, ‘आमची’ शिवसेना ही शिवसेना नाहीये…हे सगळं तोडपह्ड करुन त्यांचं समाधान होत नाही, कारण त्यांना शिवसेना संपवायची आहे, अशा शब्दांत ठाकरेंनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.

आता नवीन कोंब फुटायला लागले आहेत. शिवसेनेचं तरुण आणि युवांशी नातं शिवसेनेच्या जन्मापासूनच आहे. मात्र एक आहे, अजूनही मोठ्या संख्येने ज्येष्ठ शिवसैनिक येऊन भेटताहेत. ज्यांनी बाळासाहेबांसोबत काम केले आहे, ज्यांना आपण पहिल्या पिढीचे म्हणू. ज्यांनी शिवसेनेचा संघर्ष पाहिलाय. स्वतः संघर्ष केलाय. त्यांना शिवसेना म्हणजे काय ते नेमकं कळलेलं नाही. त्यांना शिवसेनेकडून काही मिळावं ही अपेक्षा नव्हती आणि आजही नाही. पण ते येऊन आशीर्वाद देताहेत. हेच आशीर्वाद शिवसेनेला बळ देतील, अशी आशा ठाकरेंनी व्यक्त केली आहे.

ठाकरेंना शिवसेना खरी की खोटी याचे पुरावे द्यावे लागताहेत अशी वेळ आज आणली आहे आणि हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे, यावर प्रश्नावर बोलताना ठाकरे म्हणाले, लोकं निवडणुकीची वाट पाहात आहेत. आम्हाला पुरावे द्यायची गरज नाही. लोकं म्हणतात निवडणूक येऊ द्या. यांनाच पुरुत टाकतो. ज्यांनी मी अधिकार दिले होते त्यांनीच माझा विश्वासघात केला, असे त्यांनी नमूद केले. चूक माझा आहे आणि ती पहिलीच माझ्या फेसबुक लाइव्हमध्ये कबूल केली आहे. गुन्हा माझा आहे. तो म्हणजे मी यांना परिवारातले समजून यांच्यावर अंधविश्वास ठेवला, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. महाविकास आघाडीचा प्रयोग चुकला असता तर लोकांनी उठाव केला असता. जनतेने उठाव केला असता. तसं झालं नाही. जनता आनंदी होती, कारण आल्या आल्याच आम्ही शेतकऱ्याला कर्जमुक्त केलं. त्यानंतर मी अभिमानाने सांगेन की, कोरोना काळात माझ्या मंत्रिमंडळातील सगळ्या सहकाऱ्यांनी, प्रशासनाने आणि जनतेने उत्तम सहकार्य केल्याचे ठाकरे यांनी सांगितले.

हेही वाचा :

Back to top button