एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्याबाबत देवेंद्र फडणवीसांचा मोठा खुलासा, म्‍हणाले… | पुढारी

एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्याबाबत देवेंद्र फडणवीसांचा मोठा खुलासा, म्‍हणाले...

पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्रातील सत्तेचा गड आपण जिंकलो आहोत. याचा मनस्वी आनंद आहे. राज्यात भाजप शिवसेनेचे सरकार यावं, ही तर श्रींची इच्छा होती. सरकार सत्तेवर आल्यामुळे १२ कोटी जनतेच्या मनातील संकल्पना पूर्ण झाली आहे. महाराष्ट्रात रयतेचं राज्य आल्याचा आनंद आहे, असे स्पष्ट करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा अचानक निर्णय घेतलेला नाही. त्यांना मुख्यमंत्री करण्याचे आधीपासूनच ठरले होते, असा खुलासा केला. पनवेल येथे आज (दि.२३) भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत ते बोलत होते.

फडणवीस पुढे म्हणाले की, राज्यात गेली अडीच वर्षे संघर्षात गेली, सूड उगविण्याचे काम सुरू होते. आमच्यासोबत षड्यंत्र रचले होते, आमच्या जागा पाडल्या, असा आरोप त्यांनी विरोधकांवर केला. केंद्राने राज्याला कोट्यावधींची निधी दिला. परंतु महाविकास आघाडी सरकारने कामे बंद ठेवली. राज्यात एकीकडे बदला आणि दुसरीकडे भ्रष्टाचार सुरू होता. त्यामुळे राज्यात सत्ता बदल होण्याची गरज होती. ही जनतेचीही इच्छा होती. त्यामुळे आम्ही राज्यात परिवर्तन करण्याचे ठरवले.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये अस्वस्थता होती. काँग्रेस राष्ट्रवादीविरोधात लढलो त्यांच्याशी सोबत बसण्याची वेळ आली, अशी भावना मंत्र्यांमध्ये होती. एकवेळ पक्षाचे दुकान बंद करेन, पण काँग्रेसोबत जाणार नाही, असे बाळासाहेबांनी म्हटले होते. हाच विचार घेऊन सरकारमधून एक मावळ बाहेर पडला. तो म्हणजे एकनाथ शिंदे. त्यांनी घेतलेल्या भूमिकेचे स्वागत करतो. छत्रपतींच्या मावळ्याने केलेल्या हिंमतीचे अभिनंदन करतो, अशा शब्दांत फडणवीस यांनी शिंदे यांच्या भूमिकेचे स्वागत केले.

अडीच वर्षापूर्वी उद्धव ठाकरे यांना कुठलाही शब्द दिलेला नव्हता, असा खुलासा करत फडणवीस म्हणाले की, विधानसभेच्या निकालानंतर मी उद्धव ठाकरे यांना फोन केला होता. परंतु त्यांनी घेतला नाही. कारण त्याचे राष्ट्रवादीसोबत आधीच ठरले होते, असा गौप्यस्फोट फडणवीस यांनी केला. ठाकरे नंबर गेम करण्यास तयार नव्हते. तिघांची बेरीज झाल्यानंतर त्यांनी सरकार बनवले. त्यावेळी अनेकांनी मला हे सरकार पाच वर्षे टिकणार का ? असा प्रश्न केला होता. यावर मी त्यांना उलट सवाल केला की, वेगवेगळ्या विचारांचे सरकार टिकते का ?

आम्ही सर्वसामान्यांसाठी लढत होतो. सत्तेकरिता नव्हे जनतेकरिता परिवर्तन केले, विचारांचे परिवर्तन केले. आता आपणाला अडीच वर्षाचा बॅकलॉग आता भरून काढायचा आहे. एकनाथ शिंदे २४ तास काम करणारे नेते आहेत. विरोधात पक्षात असताना आपण डिटेक्टीव्ह होतो. आता आपण सरकारमध्ये आल्याने सुपर अॅक्टीव्ह झालो आहोत. मोदी सैनिक आणि शिवसैनिकांनी एकत्र येत सरकार तयार केले आहे. राज्यातील जनतेनं निवडून दिलेले सरकार सत्तेवर आले आहे. खरी शिवसेना आमच्या सोबत आहे, असे फडणवीस म्हणाले.

हेही वाचलंत का ? 

Back to top button