राज्य मंत्रिमंडळात 30 मंत्र्यांचा समावेश शक्य | पुढारी

राज्य मंत्रिमंडळात 30 मंत्र्यांचा समावेश शक्य

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : राज्यात शिंदे गट-भाजप यांचे संयुक्त सरकार स्थापन होऊन तीन आठवडे उलटले आहेत. मात्र, अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या दिल्ली दौर्‍यावर आहेत. शुक्रवारी रात्री त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीत मंत्र्यांची यादी आणि खातेवाटप यावर चर्चा झाल्याचे कळते. या विस्तारित मंत्रिमंडळात 30 मंत्र्यांचा नव्याने समावेश होण्याची शक्यता आहे.

मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या निरोप समारंभाला हजर राहण्यासाठी शिंदे आणि फडणवीस दिल्लीत आले आहेत. शिंदे गटातील 16 बंडखोर आमदारांची पात्रता, सरकारची स्थापना, विधानसभा अध्यक्षांची नेमणूक आदी विषयांवर दाखल याचिकांवरील सुनावणी 1 ऑगस्टला होईल. त्यामुळेच अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. न्यायालयाच्या निर्णयानंतरच विस्तार होईल, असे प्रारंभिक सांगितले जात होते. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या मंगळवारी अथवा बुधवारी शपथविधी होण्याची शक्यता आहे. सुरुवातीला सोमवारी हा शपथविधी होणार, अशी चर्चा होती. मात्र, नव्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा त्या दिवशी शपथविधी होणार आहे. त्यामुळे मंगळवार अथवा बुधवार यापैकी एक दिवस निश्चित होऊ शकतो. मंत्रिमंडळात शिंदे गटाला 13 ते 14 मंत्रिपदे मिळतील, असाही एक सूर आहे.

संभाव्य मंत्री : प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, सुधीर मुनगंटीवार, राधाकृष्ण विखे-पाटील, आशिष शेलार या भाजप नेत्यांना, तर शिंदे गटातील उदय सामंत, संदीपान भुमरे, दादा भुसेे आदींना मंत्रिमंडळात स्थान असेल. सध्या शिंदे गटात असलेल्या गुलाबराव पाटील आदी 5 जणांकडे ठाकरे सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रिपदे होती.

Back to top button