राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व सेल, विभाग बरखास्त, निर्णयाला ओबीसी राजकीय आरक्षणाची किनार | पुढारी

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व सेल, विभाग बरखास्त, निर्णयाला ओबीसी राजकीय आरक्षणाची किनार

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या सूचनेवरून पक्षाचे सर्व विभाग व सेल बुधवारी बरखास्त करण्यात आले. राष्ट्रीय सरचिटणीस प्रफुल्ल पटेल यांनी तसे पत्र सर्व विभाग व सेलप्रमुखांना पाठविले आहे. या निर्णयाला ओबीसी राजकीय आरक्षणाच्या निकालाची किनार असल्याचे सांगण्यात येते.

राष्ट्रवादीचे मागासवर्गीय, ओबीसी, विद्यार्थी, वकील, धार्मिक, अपंग इत्यादी सेल (आघाडी) व विभाग असून, या प्रत्येक सेल व विभागाचे स्वतंत्र अध्यक्ष आहेत.

सरकार असले म्हणजे हे सर्व सेल तसेच विभाग सक्रिय असतात; पण आता राज्यात राष्ट्रवादी आणि मित्रपक्षांचे सरकार नाही. दुसरीकडे, बुधवारीच सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणास हिरवा कंदील दिल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या आरक्षणानुसार घेण्यात येणार आहेत. त्यामुळे पक्षाच्या ओबीसी सेलला आणखी ताकद देण्याच्या द‍ृष्टीने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येते.

केवळ हाच सेल बरखास्त केला असता, तर हेतूवर शंका घेतली गेली असती. त्यामुळे तसे न करता सर्वच सेल बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे राजकीय वर्तुळातून बोलले जाते.

Back to top button