ठाणे : ठाकरे समर्थक माजी नगरसेवक हर्षवर्धन पालांडे यांच्यावर हल्ला | पुढारी

ठाणे : ठाकरे समर्थक माजी नगरसेवक हर्षवर्धन पालांडे यांच्यावर हल्ला

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : ठाकरे समर्थक आणि माजी नगरसेवक हर्षवर्धन पालांडे यांच्यावर आज (बुधवार) सकाळी कामावर जात असताना वार झाल्याची घटना कल्याण येथील पुणा लिंक रोड येथे घडली. दरम्यान या घटनेमागे माजी नगरसेवक महेश गायकवाड असल्याचा आरोप हर्षवर्धन पालांडे यांनी केला असून, माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी मात्र हा आरोप फेटाळला आहे. माझा या घटनेशी कोणताही संबंध नाही. या घटनेत जे दोषी आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करा असे गायकवाड यांनी सांगितले.

गेले अनेक दिवस राज्याच्या राजकारणात सत्तांतरणाचे वारे वाहत आहेत. यामध्ये ठाणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारत जवळपास 50 आमदारांना शिंदे गटात सामील करून घेतले होते. त्यानंतर भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर मी उपमुख्यमंत्री पदाचा स्वीकार करत असल्याचे जाहीरपणे सांगितले. या सगळ्या सत्तांतरणानंतर शिवसेनेतील अनेक नगरसेवक आणि खासदार यांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दर्शवला होता.

मात्र कल्याण येथील हर्षवर्धन पालांडे हे मात्र शेवटपर्यंत उद्धव ठाकरे गटातच राहणार असल्याचे सांगत होते. याच पार्श्वभूमीवर मला शिंदे गटात समाविष्ट झालेल्या महेश गायकवाड यांनी मला मारहाण केली असल्याचा आरोप हर्षवर्धन पालांडे यांनी केला आहे. मात्र महेश गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता, या घटनेशी माझा कोणताही संबंध नाही. जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करा. मी एक समाजप्रिय कार्यकर्ता आहे. त्यामुळे अशा घटनांना मी पाठिंबा देत नसल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा : 

Back to top button