विधान परिषद विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसलाच हवे; पटोलेंची भूमिका | पुढारी

विधान परिषद विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसलाच हवे; पटोलेंची भूमिका

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. शिवसेनेपाठोपाठ आता काँग्रेसनेही या पदावर दावा सांगितला आहे. हे पद काँग्रेसलाच मिळाले पाहिजे, अशी भूमिका प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बोलून दाखवली.

पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी तसा आग्रह आम्ही शिवसेना आणि राष्ट्रवादीकडे धरणार आहोत, असे स्पष्ट केले. ते म्हणाले की, कनिष्ठ सभागृहात आमचे सहकारी आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली आहे. त्यामुळे वरिष्ठ सभागृहात आमचा विरोधी पक्षनेता व्हावा, अशी आमची मागणी असेल. आमचे नेते बाळासाहेब थोरात हे यासंदर्भात शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत चर्चा करतील. शिवसेनेनेही विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला आहे. त्यासाठी उपसभापती नीलम गोर्‍हे यांना पक्षाकडून पत्रही दिले गेले.

संख्याबळाच्या आधारावर हे पद शिवसेनेला मिळावे, असे या पत्रात म्हटले आहे. आमच्याकडे परिषदेत 13 आमदार असल्याचा दावा शिवसेना नेत्यांनी केला आहे. विधानसभेतील आमदारांनी बंडाळी करत शिंदे गटाचा रस्ता धरला असला, तरी या बंडाळीचे लोण अद्याप विधान परिषदेच्या आमदारांमध्ये पोहोचलेले नाही. शिवाय, येथे वर्णी लागलेले बहुतांश आमदार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निकटवर्तीयांपैकी आहेत. त्यामुळे विधान परिषदेतील शिवसेना फुटणार नाही, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. त्यामुळेच विरोधी पक्षनेतेपदासाठी अनिल परब यांच्या नावाची चर्चाही सुरू आहे.

Back to top button