अडीच वर्षे तोंड दाबून बुक्क्यांचा मार सुरू होता; मुख्यमंत्री शिंदे यांचा पुनरुच्चार | पुढारी

अडीच वर्षे तोंड दाबून बुक्क्यांचा मार सुरू होता; मुख्यमंत्री शिंदे यांचा पुनरुच्चार

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : महाविकास आघाडीत अडीच वर्षे तोंड दाबून बुक्क्यांचा मार सुरू होता. आमचे आमदार तो नाइलाजाने सहन करत होते. मी नगरविकासमंत्री आणि दोन जिल्ह्यांचा पालकमंत्री होतो. महाविकास आघाडीत मी एकटा निवडून येईल; पण बाकीच्यांचे काय, असा प्रश्न होता. म्हणून आम्हाला वेगळे पाऊल टाकावे लागले, असा पुनरुच्चार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.

जळगाव जिल्ह्यातील शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी आपल्या समर्थकांचा मेळावा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये घेतला. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी महाविकास आघाडीत अन्याय सहन करण्याच्या पलीकडे गेल्याने आपल्याला बंड करावे लागल्याचे सांगितले. ते म्हणाले की, मी मुख्यमंत्री झालोय, यावर विश्वासच बसत नाही. काहींना सुरुवातीला वाटले की, एकनाथ शिंदेंनी राजकीय आत्महत्या केली; पण आज राज्यातील वातावरण बदलले आहे. सर्वांना आपला हक्काचा माणूस मुख्यमंत्री झाल्यासारखे वाटत आहे. मी एकटा मुख्यमंत्री नाही. हे पन्नास आमदार मुख्यमंत्री झाले आहेत. मुस्लिम समाजासाठी द्वेष, भीती नाही. त्यांनाही आपला माणूस मुख्यमंत्री झाल्यासारखे वाटते. ही अन्यायाविरोधातील लढाई होती. मलाही मुख्यमंत्रिपद मिळेल, असे वाटले नव्हते, असे सांगून अन्यायाची परिसीमा ओलांडल्यानंतर माणूस कोणताही विचार करत नसतो. अडीच वर्षांत शिवसेनेला सत्तेचा काय फायदा झाला? आता आपण शिवसैनिक आणि शिवसेनेलाही सक्षम करू, असे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.

Back to top button