उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे एकत्र येणार, दीपाली सय्यद यांच्या पोस्टने खळबळ | पुढारी

उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे एकत्र येणार, दीपाली सय्यद यांच्या पोस्टने खळबळ

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : ‘येत्या दोन दिवसांत उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे शिवसैनिकांच्या भावनांचा आदर करून चर्चा करायला एकत्र येणार, हे समजल्यावर खूप बरे वाटले,’ अशी पोस्ट करत शिवसेनेच्या दीपाली सय्यद यांनी खळबळ उडवून दिली. या मध्यस्थीसाठी भाजप नेत्यांनी मदत केल्याचा दावाही त्यांनी या पोस्टमध्ये केला. शिवाय भाजपचे विनोद तावडे आणि पंकजा मुंडे यांनाही टॅग केल्याने शिवसेना आणि शिंदे गटाच्या मनोमिलनाच्या चर्चांना रविवारी उधाण आले.

शनिवारी रात्री उशिरा दीपाली सय्यद यांनी पोस्ट करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे येत्या दोन दिवसांत चर्चा करणार असल्याचे म्हटले होते. शिंदे यांना शिवसैनिकांची तळमळ समजली आणि ठाकरेंनी मोठ्या मनाने कुटुंबप्रमुखाची भूमिका निभावली, असे सय्यद म्हणाल्या. यावर रविवारी सकाळपासूनच तर्कवितर्कांचे गुर्‍हाळ सुरू झाले. शिवसेना आणि शिंदे गट एकत्र येणार का, शिवसेनेतील बंडाळी ‘मविआ’तून सुटका करून घेण्याची खेळी होती का? इथपासून शिंदे गट आणि ठाकरे हे राजकीय वास्तव लक्षात घेत एकत्र येण्याच्या प्रयत्नात आहेत का, असे प्रश्न चर्चिले गेले.

एकत्रित यावे, असे का वाटणार नाही : संजय राऊत

मात्र, शिंदे गटाने शिवसेनेसोबत यावे असे वाटते का, या प्रश्नावर संजय राऊत यांच्या उत्तरानेही चर्चेला जागा करून दिली. ते आमचेच सहकारी आहेत, मित्र आहेत. ते आज माझ्यावर टीका करत असले, तरी ती त्यांची मजबुरी आहे. भाजपमुळे त्यांच्यावर ती ओढवली आहे. तरीसुद्धा गेली अडीच वर्षे ते आमच्यासोबत सत्तेत होते. अनेक अडचणीत आम्ही एकत्र काम केले. त्यांच्यासाठी मी अनेकदा झगडलो आहे. त्यामुळे एकत्रित यावे असे का वाटणार नाही, असा प्रतिप्रश्न संजय राऊत यांनी केला.

शिंदे-ठाकरे यांनी एकत्र यावे : सय्यद

दरम्यान, संजय राऊत यांनी याप्रकरणी फटकारल्यानंतर सय्यद यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. उद्धव ठाकरे यांच्याकडे आम्ही वडीलधारे म्हणूनच पाहतो. शिवसेनेत दोन गट पडावेत, अशी माझी इच्छा नाही. त्यामुळे सगळ्यांनी एकत्र येण्यातच शिवसेनेचे भले आहे. उद्धव ठाकरे यांनी वेळोवेळी बंडखोर आमदारांसाठी ‘मातोश्री’चे दरवाजे नेहमी उघडे असतील, असे सांगितले आहे. त्यामुळे मान-अपमान बाजूला ठेवून एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे, असे सय्यद म्हणाल्या. तसेच मला जे वाटते, ते मी मांडते. तुटलेले घर एकत्र यावे, हे कार्यकर्ती म्हणून मला वाटते. संजय राऊत हे मोठे आहेत, त्यांना बोलण्याचा अधिकार आहे. राऊत यांनी शांततेचा पवित्रा घ्यावा आणि मध्यस्थी घडवून आणावी, असे आवाहनही सय्यद यांनी केले. एकाच कुटुंबाचे असे गट ही न बघवणारी स्थिती आहे. एकाच आधारवडाखाली शिवसेनेचे कार्यकर्ते असणे महत्त्वाचे आहे. आता अधिकचा वेळ न जाता, एकत्र यावे हे माझ्या एकटीच्याच नाही, तर असंख्य शिवसैनिकांच्या मनातही आहे. भविष्यातील नुकसान टाळण्यासाठी या दोन्ही गटांनी एकत्र यायला हवे. त्यासाठीच मी मध्यस्थीची भूमिका घेत आहे, असेही सय्यद म्हणाल्या.

संजय राऊत यांनी फटकारले

शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी दिल्लीत माध्यमांशी बोलताना दीपाली सय्यद यांना फटकारले. दीपाली सय्यद अभिनेत्री आहेत. त्या पक्षाचे काम करतात. त्यांना हे अधिकार कोणी दिले याची मला माहिती नाही. त्या शिवसेनेच्या नेत्या नाहीत. पदाधिकारी आहेत. तसेच त्या प्रवक्त्यादेखील नाहीत. त्यामुळे त्यांनी अशा प्रकारची वक्तव्ये खूप काळजीपूर्वक करणे गरजेचे आहे, असे राऊत म्हणाले.

Back to top button