मुंबई : महाराष्ट्रातील दोन मंत्र्यांचे मंत्रिमंडळ घटनेनुसार अवैध | पुढारी

मुंबई : महाराष्ट्रातील दोन मंत्र्यांचे मंत्रिमंडळ घटनेनुसार अवैध

मुंबई वृत्तसंस्था  :  राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयासंबंधी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एक ट्विट केले आहे. गेले दोन आठवडे महाराष्ट्रात दोन मंत्र्यांचे मंत्रिमंडळ जे निर्णय घेतेय ते घटनात्मकद‍ृष्ट्या अवैध आहे. राज्यपाल महोदय, हे काय सुरू आहे? असा सवालच त्यांनी केला आहे.

भारतीय राज्यघटनेच्या कलम 164 – 1 नुसार राज्याचे मंत्रिमंडळ किमान 12 मंत्र्यांचे असणे बंधनकारक आहे. त्यापेक्षा कमी संख्येच्या मंत्रिमंडळाला घटनेची मान्यता नाही. गेले दोन आठवडे महाराष्ट्रात दोन मंत्र्यांचे मंत्रिमंडळ जे निर्णय घेतेय, त्याला घटनात्मक वैधता नाही, असे राऊत यांनी म्हटले आहे.  शिवसेना सोडून गेलेल्यांनी शिवसेनेच्या नावावर माधुकरी मागून जगू नये. त्यांनी स्वतंत्र पक्ष स्थापन करावा, अशा शब्दांत संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांचा समाचार घेतला. राज्यातील सध्याचे सरकार हे बेकायदा सरकार आहे. या सरकारमध्ये एक मुख्यमंत्री आणि एक उपमुख्यमंत्री आहेत. हे दोघे एक दुजे के लिए चित्रपटासारखे आहेत. त्यांचाही राजकीय अंत या चित्रपटासारखाच होईल, असा इशाराही राऊत यांनी दिला.

माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी बंडखोरांवर पुन्हा एकदा निशाणा साधला. ते म्हणाले, शिवसेना ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचीच आहे. शिवसेना सोडून गेलेल्यांनी बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेच्या नावाचा गैरवापर करू नये. यावेळी राऊत यांनी बंडखोरांवर तीव्र शब्दात टीका केली. बेईमानी करणारी व्यक्‍ती शेवटपर्यंत बेईमान नसल्याचे सांगते. तसेच हे लोक शिवसेना सोडली नसल्याचे, शिवसेनेतच असल्याचे सांगत आहेत. त्यांनी स्वतंत्र पक्ष स्थापन करावा, शिवसेनेच्या नावावर कशाला जगता, असा सवालही राऊत यांनी केला.

सोबत आलेल्या एकाही आमदाराचा पराभव झाल्यास राजकारण सोडून देईन, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले होते. त्यावर संजय राऊत म्हणाले, बंडखोरांच्या नेत्यांना अशी वक्‍तव्ये करावी लागतात. मात्र ज्यांनी शिवसेना फोडली, त्यातील अनेकजण बरीच वर्षे राजकारणातून बाहेर होते, हे लक्षात ठेवावे, असा टोला त्यांनी हाणला.

ते कलम आकाराशी संबंधित : आशिष शेलार
दरम्यान, विस्ताराच्या कालावधीचा संविधानाच्या कलमात कुठेही उल्‍लेख नाही. अज्ञान आणि विपर्यासाचा काळ संपला, असे खोचक ट्विट करत भाजपचे आमदार अ‍ॅड. आशिष शेलार यांनी राऊत यांना टोला हाणला आहे.
शेलार म्हणतात, संविधानातील कलम मंत्रिमंडळाचा आकार किती असावा याच्याशी संबंधित आहे. एकूण सदस्य संख्येपेक्षा 15 टक्के अधिक मंत्री नकोत. पण असे करताना किमान 12 मंत्री हवेत, असा त्याचा अर्थ आहे. उदाहरणार्थ गोव्यासारख्या लहान राज्यांसाठी ही तरतूद आहे, असेही शेलार यांनी म्हटले आहे. महाविकास आघाडीत 7 जणांच्या मंत्रिमंडळाने 32 दिवस निर्णय घेतले, याची आठवणही शेलार यांनी संजय राउतांना करून दिली. एकूणच आता संजय राऊ त यांच्याविरोधात भाजपच्या नेत्यांनी टीकेची मोहिम सुरू केल्याचे जाणवत आहे.

केंद्राकडून लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न
संसदेत प्रखर बोलण्यावर बंदी घातली गेली असल्याचे सांगत संजय राऊत म्हणाले, सत्य बोलण्यासाठी आवश्यक असणार्‍या शब्दांवर बंदी घातली आहे. ही बंदी लोकशाहीविरोधात आहे. अशा प्रकारची बंदी म्हणजे लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न आहे, अशी टीकाही राऊत यांनी यावेळी केली.

Back to top button