शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चर्चा करायला एकत्र येणार? | पुढारी

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चर्चा करायला एकत्र येणार?

मुंबई, पुढारी ऑनलाईन : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी बंड करत भाजपच्या मदतीने राज्यात सरकार स्थापन केले आणि ते स्वत: मुख्यमंत्री झाले. बंडाच्या सुरुवातीपासूनच शिवसेना आणि अपक्ष आमदारांनी शिंदे यांना पाठिंबा दिला. या आमदारांच्या पावलावर पाऊल ठेवत राज्यातील अनेक जिल्ह्यामधील शिवसेनेचे नगरसेवक आणि पदाधिकारी शिंदे गटात सामील होऊ लागले आहेत. आपलीच शिवसेना खरी असा दावा शिंदे गटाकडून केला जात आहे, मात्र उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने आव्हान दिले आहे.

दरम्यान, शिवसेनेचेच्या नेत्या दीपाली सय्यद यांनी मोठे विधान केले असून त्यांच्या या विधानाने राज्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे. येत्या दोन दिवसांमध्ये उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहिल्यांदाच चर्चा करायला एकत्र येणार हे समजल्यावर खूप बरे वाटले, असे दीपाली सय्यद यांनी म्हटले आहे. ट्विटवर त्यांनी याची माहिती दिली आहे. त्यांनी काल (दि. १६) रात्री उशिरा ट्विट केले असून यात त्यांनी भाजप नेत्यांचे आभारही मानले आहेत. तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चर्चेसाठी एकत्र यावे यासाठी भाजपच्या नेत्यांनी मदत केल्याचे म्हटले आहे.

दीपाली सय्यद आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, ‘येत्या दोन दिवसांत आदरणीय उद्धवसाहेब व आदरणीय शिंदेसाहेब शिवसैनिकांच्या भावनांचा आदर करून पहिल्यांदा चर्चा करायला एकत्र येणार हे समजल्यावर खूप बरे वाटले. शिंदे साहेबांना शिवसैनिकांची तळमळ समजली आणि उद्धव साहेबांनी कुटुंबप्रमुखाची भूमिका मोठ्या मनाने निभावली हे स्पष्ट झाले आहे. या मध्यस्थीकरिता भाजप नेत्यांनी मदत केली याबाबत धन्यवाद! चर्चेच्या ठिकाणाची प्रतीक्षा असेल.

दरम्यान, हे ट्विट करण्यापूर्वी दीपाली सय्यद यांनी शिवसेना युवासेनेचे नेते, माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासंदर्भातही एक ट्विट केले आहे. आदित्य ठाकरे हे लवकरच मंत्रिमंडळात दिसावेत, तसेच शिवसेनेच्या ५० आमदारांनी मातोश्रीवर दिसावे आणि उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एक व्हावेत, असे सय्यद यांनी म्हटले आहे. शिवसेना हा गट नसून तो हिंदुत्वाचा गड आहे. त्यावरचा भगवा नेहमी डौलाने फडकत राहील, असा विश्वासही त्यानी व्यक्त केला आहे.

Back to top button