

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील शिंदे सरकारच्या विस्ताराचा अखेर मुहूर्त ठरला आहे. सोमवारी होणार्या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीनंतर बुधवारी या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. भाजपचे सात आणि शिंदे गटाचे पाच मंत्री या दिवशी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतील, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी शनिवारी दिली.
राज्यात नवे सरकार सत्तारूढ होऊन 16 दिवस उलटले आहेत. मात्र अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ 3 जूनला घेतली. शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या अपात्रतेबाबतच्या याचिकेवर 11 जुलैला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होती. त्यामुळे दोघांचाच शपथविधी झाला. न्यायालयातील सुनावणीनंतर लगेचच विस्तार होईल, अशी अटकळ बांधली जात होती. मात्र तसे घडले नाही. त्यामुळे मंत्रिपदाची आस लावून बसलेल्या आमदारांची अस्वस्थता वाढली. शिवाय विरोधी महाविकास आघाडीकडूनही या मुद्द्यावर टीका सुरू झाली. दरम्यान, राष्ट्रपतिपदाच्या रालोआच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू दोन दिवसांपूर्वी मुंबई दौर्यावर आल्या होत्या. त्यातच सोमवारी राष्ट्रपतिपदाची निवडणूक होत आहे. या सर्व गोंधळात मंत्रिमंडळाच्या विस्ताराला मात्र मुहूर्त मिळत नव्हता. मात्र आता अखेर बुधवारी मंत्रिमंडळाचा शपथविधी होत आहे.
शिंदे – फडणवीस सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपचे सात आणि शिंदे गटाचे पाच आमदार शपथ घेतील, अशी शक्यता आहे. मुख्यमंत्रिपद एकनाथ शिंदे यांना दिले असले तरी मंत्रिमंडळात भाजपचे मंत्री जास्त असतील. उपमुख्यमंत्रिपदासह 27 मंत्रिपदे भाजपला तर मुख्यमंत्रिपदासह 17 मंत्रिपदे शिंदे गटाच्या पदरात पडतील, असे सांगितले जाते. मात्र पहिल्या विस्तारात भाजपचे सात आणि शिंदे गटाचे पाच मंत्री शपथ घेतील, असे सांगितले जात आहे. राज्यात पूरग्रस्त परिस्थिती असल्याने तातडीने मंत्रिमंडळ विस्तार करणे गरजेचे आहे. शिवाय विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशनही लवकरच होणार आहे. यासाठी पहिल्या टप्प्यात निवडक मंत्री घेऊन विस्तार केला जात आहे.
शिंदे गटाकडून उत्तर महाराष्ट्रातून गुलाबराव पाटील, मराठवाड्यातून संदिपान भुमरे, अब्दुल सत्तार, कोकणातून दीपक केसरकर, उदय सामंत, भरत गोगावले, पश्चिम महाराष्ट्रातून प्रकाश आबिटकर ही सात नावे मंत्रिपदासाठी चर्चेत आहेत. यातून पाच नावे पहिल्या विस्तारासाठी अंतिम करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खूपच कसरत होत आहे. इच्छुकांची गर्दी पाहून पहिला मोठा विस्तार करण्याचा शिंदे यांचा प्रयत्न आहे. पण पावसाळी अधिवेशनानंतर मोठा विस्तार करूया, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले आहे. पहिल्याच अधिवेशनात आमदारांची नाराजी टाळण्यासाठी हा छोटा विस्तार करण्यात येईल. यावर दोन दिवसांत शिंदे -फडणवीस यांच्यात अंतिम चर्चा होणार असल्याचे कळते.