

पुढारी ऑनलाईन डेस्क : विरोधकांची लाईन डेड आहे, म्हणून त्यांना डेडलाईन हवी आहे, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना लगावला. पराभव दिसू लागला म्हणून विरोधी पक्षनेते अजित पवार सरपंच आणि नगराध्यक्षाच्या थेट निवडीच्या निर्णयावर टीका करत आहेत, असे प्रत्युत्तर फडणवीस यांनी यावेळी दिले. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी फडणवीस (Devendra Fadnavis) बोलत होते.
(Devendra Fadnavis) महाराष्ट्रातच नव्हे, तर अनेक राज्यात सरपंच, नगराध्यक्ष यांची निवड थेट जनतेून केली जाते. याबाबतची निर्णय भाजप शिवसेना युतीच्या काळात आम्ही घेतला होता. परंतु, आर्थिक देवाणघेवाण करता येत नसल्याने महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर त्या सरकारने हा निर्णय रद्द केला होता. थेट निवडीमुळे अनेक ठिकाणी भाजपचे सरपंच, आणि नगराध्यक्ष निवडून आले होते, असे सांगून आता पराभव समोर दिसू लागल्याने अजित पवार या निर्णयावर टीका करू लागल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
तर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई विमानतळ, असे नामकरण करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. नामकरणाबाबतचा प्रस्तावाच्या मंजूरीचे 29 जून 2022 रोजीच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीचे कार्यवृत्त मान्यतेसाठी नव्याने स्थापन झालेल्या मंत्रिमंडळासमोर आणण्यात आले होते. त्यावर हा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी फेरसादर करावेत असे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार हा प्रस्ताव आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत फेरसादर करण्यात आला व त्याला मंत्रिमंडळाने मान्यता दिली.
नवी मुंबईमधील प्रकल्पग्रस्तांच्या मागणीनुसार 12.56 योजनेच्या अंमलबजावणीसाठी स्व. पाटील यांचे योगदान आहे. तद्नंतर आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी संपादित जमिनीसाठी मोबदला ठरवावयाच्या अनुषंगाने निश्चित करण्यात आलेले 22.5 टक्के योजनेचे धोरण सुद्धा 12.5 टक्के धोरणाच्या धर्तीवर तयार करण्यात आले आहे.
नवी मुंबई येथे सिडको महामंडळाच्या माध्यमातून 1160 हे. क्षेत्रावर सार्वजनिक खाजगी भागीदारीतून ग्रीनफील्ड विमानतळ विकसित करण्यात येत आहे. या संपूर्ण 1160 हे. जमिनीचे संपादन पूर्ण झाले असून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाची भूविकास कामे प्रगतीपथावर आहेत. या विमानतळाच्या नामकरणाच्या अनुषंगाने नवी मुंबईमधील विविध संघटना व राजकीय पक्षांकडून मागणी करण्यात येत होती.
नवी मुंबई परिसरातील विकासामधील दि. बा. पाटील यांचे योगदान व स्थानिकांच्या विविध संघटनांची मागणी विचारात घेता, नवी मुंबईत होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नामकरण "लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई विमानतळ असे करण्यास आज मान्यता देण्यात आली.
एमएमआरडीएला मुंबई महानगर क्षेत्रात विविध प्रकल्प राबविण्यासाठी 60 हजार कोटींपर्यंतचे कर्ज उभारण्यास तसेच शासन हमीस आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या कर्जापैकी पहिल्या टप्प्यात उभारण्यात येणाऱ्या 12 हजार कोटी रकमेची शासन हमी देण्यास आणि शासन हमीवरील मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत मुंबई महानगर क्षेत्रात 1 लाख 74 हजार 940 कोटी किंमतीचे महत्त्वाकांक्षी पायाभूत प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. यामध्ये विविध मेट्रो रेल प्रकल्प, बोरीवली- ठाणे भुयारी मार्ग, ठाणे कोस्टल रोड व शिवडी वरळी कनेक्टर, इत्यादी महत्वाच्या प्रकल्पांचा समावेश आहे. प्राधिकरणामार्फत हाती घेण्यात आलेल्या या प्रकल्पांना निधी उपलब्ध होऊन प्रकल्प विहित वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने हे निर्णय घेण्यात आले.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अधिनियमातील कलम 21 नुसार शासनाची पूर्वमान्यता घेण्याची तरतूद विचारात घेता महत्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्राधिकरणास आवश्यकतेनुसार 60 हजार कोटी पर्यंतचे कर्ज उभारण्यास शासनाची मान्यता प्रदान करण्यात आली, असे शिंदे आणि फडणवीस यांनी सांगितले.
हेही वाचलंत का ?