विरोधकांची सरकारे बरखास्त करणार्‍यांची सत्ता जनता उलथवेल : शरद पवार | पुढारी

विरोधकांची सरकारे बरखास्त करणार्‍यांची सत्ता जनता उलथवेल : शरद पवार

मुंबई : पुढारी वृत्तसेवा विरोधी पक्षांची राज्य सरकारे बरखास्त करणार्‍यांची सत्ता भविष्यात जनता उलथवून टाकल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपचे नाव न घेता दिला.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे मंगळवारी आयोजित केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्य कार्यकारिणी बैठकीत ते बोलत होते. पवार म्हणाले, देशातील अनेक राज्य सरकारे बरखास्त करण्याचा प्रयत्न सुरू आहे. सत्ता केंद्रित करणारा प्रयत्न जनता पाहत असते. ती बोलत नसते; पण निरीक्षण करत असते. राज्यातही सत्ता बरखास्त करण्यात आली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी विरोधातील अडीच वर्षे लोकांच्या मदतीला धावून जावे.

भाजप सध्या संसदीय लोकशाहीवर हल्ला करत आहे. मध्य प्रदेशनंतर महाराष्ट्रात काय झाले, तुम्हाला माहीत आहे. लोकशाही मार्गाने आलेल्या लोकांना बाजूला करून सत्ता आपल्या हातात कशी राहील, असा प्रयत्न होत आहे. हा सत्तेचा दोष आहे. सत्ता केंद्रित झाली, तर ती एका हातात जाते. त्यामुळे सत्ता विकेंद्रित झाली पाहिजे, तर ती अनेक लोकांच्या हातात जाते. मात्र, हल्ली केंद्रातील सरकार सत्ता केंद्रित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ‘ईडी’, ‘सीबीआय’ आपल्याला माहीत नसलेल्या संस्था आता माहीत होऊ लागल्या आहेत. ‘ईडी’चा काँग्रेसकडून कधी वापर झाला नाही. आता सत्तेचा वापर करून राजकीय दहशत निर्माण केली जात आहे. त्यामुळे सर्वांसाठी आज हा संघर्षाचा काळ आहे, असेही पवार म्हणाले. आणीबाणीची आठवण सांगत, 1977 मध्ये इंदिरा गांधी यांनाही पराभवाला सामोरे जावे लागले होते, अशी आठवण सांगत पवारांनी भाजपला इशारा दिला आहे.

आगामी नगर परिषद, नगरपालिका निवडणुकांत 50 टक्के तरुण पिढीला संधी द्या. हीच पिढी आपल्या पक्षाच्या पाठीशी उभी राहील, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्‍त केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, शरद पवार यांच्या कल्पकतेने राज्यात नवीन सरकार स्थापन झाले होते. हे आव्हान दिल्लीतील लोकांना आवडले नाही. पहिल्या दिवसापासून आघाडी सरकार पाडण्याचा प्रयत्न झाला. विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी तयार राहण्याचे आवाहन पदाधिकार्‍यांना केले. या निवडणुका आघाडीच्या माध्यमातून करा किंवा ताकद असेल तेथे एकट्याची ताकद दाखवा. भाजपचा पराभव करायचा असेल त्या ठिकाणी एकत्र आले पाहिजे, असे मतही त्यांनी व्यक्‍त केले.

शिवसेनेतील राजकीय घडामोडींवर पवार म्हणाले, या पक्षाचे आमदार फुटले असले,तरी शिवसैनिक कुठेही हलला नाही. सत्ताबदल करणार्‍यांविरोधात शिवसैनिक एकत्र झाला आहे. एखाद् दुसरा सोडला, तर एकही निवडून येणार नाही, हे मला शिवसैनिक सांगत आहेत. सत्तापरिवर्तन झाले ते लोकांना आवडलेले नाही. शिवसैनिक नाराज असल्यामुळे भविष्यात राज्यात चांगले चित्र असेल. शिवसेना भविष्यात नव्या ताकदीने उभी राहील. याबद्दल मला विश्‍वास वाटतो. आगामी निवडणुकांमध्ये शिवसेनेला फायदाच होईल, असे शरद पवार यांनी सांगितले. इतर पक्षांमध्येही फाटाफूट झाली. परंतु, राष्ट्रवादीचा एकही आमदार फुटला नाही, याबद्दल त्यांनी समाधान व्यक्‍त केले.

हेही वाचा

Back to top button