तेव्हा लाज वाटली नव्हती का : भरतशेठ गोगावले | पुढारी

तेव्हा लाज वाटली नव्हती का : भरतशेठ गोगावले

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : 2019 साली शिवसेना-भाजपने एकत्र निवडणूक लढवल्या होत्या. जनतेने या युतीलाच कौल दिला होता. मात्र, त्यानंतरही आपण असंगाशी संग करत काँग्रेस, राष्ट्रवादीशी घरोबा केला. लोकभावनेला पायदळी तुडवत असताना आपल्याला लाज वाटली नव्हती का, असा सवाल शिंदे गटाचे प्रतोद भरतशेठ गोगावले यांनी विचारला आहे.

दहिसर येथील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये भाषण करताना खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटातील आमदारांवर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला गेला. त्यावर गोगावले यांनी हे उत्तर दिले आहे. यापूर्वी झालेल्या चुका टाळून आता तरी असंगाशी संग सोडा, असे आवाहनही त्यांनी केले आहे. बाळासाहेबांच्या धगधगत्या विचारांची ही हिंमत आहे. त्यामुळे कुणी आम्हाला आव्हान देऊ नये. त्याचे चटके अनेकांना सहन होणार नाहीत, असा अप्रत्यक्ष इशाराही त्यांनी दिला आहे.

शिवसेनेचे काही आमदार आजही या युतीच्या बाहेर आहेत. त्यांनी आता जनाची नाही तर मनाची लाज बाळगत काँग्रेस-राष्ट्रवादीची साथ सोडून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दाखवलेल्या हिंदुत्वाची पुन्हा एकदा कास धरावी, असे आवाहनही त्यांनी केले. सुबह का भूला शाम को घर लौटा तो उसे भूला नहीं कहते, असेही गोगावले यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले आहे.

Back to top button