सेनेत संघटनात्मक बदलांचे संकेत! मुंबई राखण्यासाठी मातोश्रीवर बैठका | पुढारी

सेनेत संघटनात्मक बदलांचे संकेत! मुंबई राखण्यासाठी मातोश्रीवर बैठका

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : विधिमंडळ पक्षातील बंडाळीचे लोण संघटनेत पसरू नये, यासाठी शिवसेना नेतृत्वाने कंबर कसली आहे. विशेषतः आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईचा बालेकिल्ला टिकविण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यासाठी शिवसेनेत संघटनात्मक बदलाचे संकेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी मातोश्री निवासस्थानी मुंबईतील विभागसंघटक, शाखाप्रमुखांशी चर्चा करताना दिले.

पक्षातील बंडाळीचा मुंबईतील पक्षसंघटनेवर किती परिणाम होईल, याची चाचपणी सध्या सुरू आहे. स्वतः उद्धव ठाकरे हे संबंधितांशी या अनुषंगाने व्यक्तिगत चर्चा करत आहेत. संघटनेतील एकनाथ शिंदे समर्थक पदाधिकार्‍यांच्या, सहानुभूतीदारांचा अंदाज घेतला जात आहे. शिवाय, बदलत्या राजकीय समीकरणात किती प्रमाणात कार्यकर्ते फुटू शकतात, नाराजांची मते काय आहेत याबाबत चर्चा-बैठकांतून आडाखे बांधले जात आहेत. संभाव्य गळती रोखण्यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे. शिवसेनेतील बंडाला मुंबईतून साथ मिळणार नाही, असा पक्षनेतृत्वाला विश्वास होता. मात्र, तब्बल पाच आमदारांनी बंडखोरांचा रस्ता धरला. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुका लक्षात घेता, गेलेल्या आमदारांच्या मतदारसंघात पर्यायी नेतृत्वाच्या माध्यमातून संघटना शाबूत ठेवण्याची कसरत सध्या सुरू आहे.

नव्याने झालेल्या वॉर्डरचनेच्या आधारे पालिका निवडणुकीसाठी कशी तयारी करायची, याबाबत ठाकरे यांच्याकडून शिवसैनिकांना सूचना जात आहेत. शिंदे समर्थकांच्या जागी नव्या नेमणुका होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात न्याय मिळेल, असा विश्वासही बैठकीत व्यक्त झाला.

Back to top button