बंडाची पेरणी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होत असतानाच; शहाजीबापू पाटील यांचा खळबळजनक खुलासा | पुढारी

बंडाची पेरणी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होत असतानाच; शहाजीबापू पाटील यांचा खळबळजनक खुलासा

मुंबई : पुढारी वृत्तसेवा शिवसेनेतील बंडाची पेरणी उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री होत असतानाच झाली होती, असा खळबळजनक खुलासा शिवसेनेचे बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील यांनी केला. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
आम्ही तडफडायचो. ज्यांच्याविरोधात लढलो तीच माणसे आपल्यासोबत सत्तेत. आपली कामे कशी होणार? अशी सगळीच काळजी होती. शिवसेनेच्या 55 आमदारांपैकी 50 आमदारांना त्यावेळचे सत्ताकारण आवडले नव्हते. आपण राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधून शिवसेनेत आलो होतो. आता त्यांचे मंत्री झाले तर आपली कामे करणार नाहीत, अशीच भीती इतरांनाही होती, असे पाटील यांनी स्पष्ट केले.

काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर सत्ता स्थापन केल्यानंतर निधीबाबत होणारा दुजाभाव, शिवसेना आमदारांतील अस्वस्थता ते शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेले बंड असा प्रवास पाटील यांनी उलगडला. मी आतापर्यंत 300 कोटी रुपयांपर्यंत निधी नेला. मंत्री असूनही अजित पवार आणि जयंत पाटील यांना ते माहीत नाही; पण आतापर्यंत बारामतीचा निधी 1500 कोटी रुपयांचा झाला. रोहित पवारांचा निधी साडेसातशे कोटींंचा… मग ही तफावत कशासाठी? भाजपला निधी कमी दिला जात होता. सत्तेत असूनही शिवसेनेला पुरेसा निधी दिला जात नव्हता. राष्ट्रवादीच्या नेत्यांना मात्र सहजासहजी निधी उपलब्ध होत होता. मी उद्धव ठाकरे यांना ही गोष्ट सांगितली होती, असे पाटील म्हणाले.

बदनामीचे षड्यंत्र

खासदार संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांना वैयक्तिक मोठा आर्थिक लाभ झाल्याचा आरोप केला होता. यावर बोलताना शहाजीबापू म्हणाले, आम्ही गेल्यानंतर माघारी येणार नाही, हे लक्षात आल्याने आमच्या बदनामीचे षड्यंत्र रचले गेले. राऊत यांनी भाषेची मर्यादा ओलांडली. अलिबागच्या भाषणात त्यांनी आक्षेपार्ह शब्द वापरले.

…आणि ठिणगी पडली

बंडखोरीची ठिणगी कुठे पडली?, या प्रश्‍नावर पाटील म्हणाले, शिवसेनेचा वर्धापनदिन होता. हॉटेलमध्ये कार्यक्रम होता. आम्ही सर्व आमदार बसलो होतो. स्टेजवर मान्यवरांच्या खुर्च्या होत्या. संजय राऊतांचे भाषण सुरू होते. तेवढ्यात उद्धव ठाकरे आले. त्यांनी सर्वांना नमस्कार केला. ते दोन मिनिटांसाठी बाहेर जाणार होते. ते बाहेर जात होते. तेव्हा संजय राऊतांचे भाषण सुरू होते. उद्धव ठाकरे जाऊन माघारी आले. त्यांचे भाषण सुरू झाले. ते रागाने बोलायला लागले. मला माहितेय… कोण बाजारात दूध विकतेय.. जे गद्दार आहेत, त्यांना पुन्हा शिवसेनेत स्थान नाही वगैरे…. बाहेर आल्यानंतर आम्ही विचारातच पडलो. कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांना लांब बसवले होते. शिंदे गटनेते आहेत. उद्धव ठाकरे यांच्या शेजारी त्यांना बसवायला हवे होते; पण कोपर्‍यात बसवले. बाहेर आल्यानंतर आम्ही शिंदे यांना म्हटले, हे असेच घडणार असेल तर पक्ष सोडलेला बरा… आम्हाला खूप मार्ग आहेत. सर्व आमदार शिंदे यांना सांगत होते. तुम्ही काहीतरी निर्णय घ्या. अन् बंडखोरीला तेथूनच सुरुवात झाली.

जिंकायचे म्हणूनच गेलो होतो…

बंडखोरीचे नेतृत्व एकनाथ शिंदे यांनी करावे, असे आमचे म्हणणे होते. हो-ना करत अखेर त्यांनी निर्णय घेतला. आम्ही जिंकायचे म्हणूनच गेलो होतो आणि आम्ही जिंकलो.

  • बारामतीला 1500 कोटींचा निधी
  • रोहित पवारांचा निधी 700 कोटी
  • राष्ट्रवादीच्या नेत्यांना सहज निधी
  • सत्तेत असूनही शिवसेना आमदारांची कुचंबणा

हेही वाचा

Back to top button