जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी १८ जुलैला प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी | पुढारी

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी १८ जुलैला प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील २५ जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या २८४ पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी निवडणूक विभाग व निर्वाचक गणनिहाय प्रारुप मतदार याद्या १८ जुलै २०२२ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्यावर २२ जुलैपर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील, असे राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे.

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात या निवडणुका होणार आहेत.

भारत निवडणूक आयोगाने तयार केलेल्या व ३१ मे २०२२ रोजी अस्तित्वात असलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्या या निवडणुकांसाठी वापरण्यात येणार आहेत. निवडणूक विभाग व निर्वाचक गणनिहाय प्रारुप मतदार याद्या १८ जुलै रोजी प्रसिद्ध झाल्यानंतर त्यावर त्या दिवसापासून २२ जुलैपर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. त्यानंतर निवडणूक विभाग व निर्वाचक गणनिहाय मतदार याद्या २९ जुलै रोजी अंतिम व अधिप्रमाणित करून प्रसिद्ध करण्यात येतील. मतदान केंद्रांची यादी व मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या ८ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केल्या जातील.

Back to top button