बॉम्ब ठेवल्याचा फेक कॉलकरुन रेल्वे पोलिसांची रात्रभर उडवली झोप | पुढारी

बॉम्ब ठेवल्याचा फेक कॉलकरुन रेल्वे पोलिसांची रात्रभर उडवली झोप

कल्याण; पुढारी वृत्तसेवा : अंबरनाथ रेल्वे स्थानकात बॅगेत बॉम्ब ठेवल्याचे सांगून रेल्वे पोलिसांची रात्रभर झोप उडवणाऱ्या दोघांना कल्याण लोहमार्ग पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अतुल प्रजापती आणि प्रदीप प्रजापती असे अटक केलेल्या आरोपीचे नावे असून दोघेही कळवा भागात राहणारे रहिवासी आहेत.

रविवारी रात्री 8.30 च्या सुमारास एका इसमाने रेल्वेच्या हेल्पलाइन क्रमांकावर फोन करत अंबरनाथ रेल्वे स्थानकात एका बॅगध्ये बॉम्ब ठेवल्याचे त्याने सांगितले. पोलिसांना माहिती मिळताच ताबडतोब बॉम्बशोधक पथक, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर, रेल्वे स्थानकात शेकडो लोहमार्ग पोलिसांचे पथक अंबरनाथ रेल्वे स्थानकाच्या घटनास्थळी पोहोचले.

त्यानंतर रेल्वे पोलीस पथकाने प्लॅटफॉर्मवरील प्रत्येक लहान-मोठ्या गोष्टीची आणि प्रवाशांची तपासणी केली. मात्र पोलिसांना स्टेशन परिसरात काहीही आढळून आले नसल्याने पोलिसांनी कंट्रोल रुमला फोन करणाऱ्या मोबाईल नंबरचा शोध सुरू केला. कॉल करणाऱ्या दोन जणांना कळवा परिसरातून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता तो फेक कॉल त्यांनी केल्याची कबुली या दोघांनी दिली. अंबरनाथ मध्ये राहणारे आपल्या नातेवाईकांकडे भेटण्यासाठी आले होते. रात्री साडेबाराच्या सुमारास स्टेशनवरून घरी परतत असताना पोलिसांशी खोडसाळपणा करण्याच्या हेतूने या दोघांनी पोलीस कंट्रोल रूमला फेक कॉल केल्याचे दोघांनी सांगितले.

Back to top button