घाटकोपरच्या खंडोबा टेकडी परिसरात कोसळली दरड ; सुदैवाने जीवितहानी टळली | पुढारी

घाटकोपरच्या खंडोबा टेकडी परिसरात कोसळली दरड ; सुदैवाने जीवितहानी टळली

घाटकोपर पुढारी वृत्तसेवा : घाटकोपर येथील खंडोबा टेकडी वर असलेल्या पंचशील नगर येथे एका घरावर दरड कोसळल्याची घटना मंगळवार दि ५ रोजी घडली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी घराचे मोठे नुकसान झाले आहे. मुंबईसह उपनगरात पहाटे पासून जोरदार पाऊस कोसळत आहे.

याचा परिणाम मुंबईत पडझडीच्या, दरड कोसळल्याचा घटना ही घडल्या. घाटकोपर च्या खंडोबा टेकडीवर, पंचशील नगर मध्ये ही पहाटे आठ वाजता एका घरावर दरड कोसळली. संतोष उपाले आणि त्यांचे कुटुंबीय असे पाच जण ही घटना घडली तेव्हा घरात होते. अचानक आवाज झाला आणि दरडी सह एक मोठे झाड त्यांच्या घरावर कोसळले. भयभीत होऊन संपुर्ण कुटुंब जीव मुठीत घेऊन बाहेर पळाले. जीव वाचला मात्र घराचे आणि घरातील साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे.

या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान, घाटकोपर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. कोसळलेले झाड आणि दरड काढण्याचे कार्य सुरू आहे. खंडोबा टेकडी परिसरात संरक्षक भिंत आणि वाढत चाललेल्या अनधिकृत झोपडपट्टी चे प्रमाण आणि प्रशासनाचा याकडे होणारा कानाडोळा यामुळे दरवर्षी या ठिकाणी अश्या घटना होत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

हेही वाचा

Back to top button