

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : कुपोषणामुळे आदिवासी भागातील लहान मुलांच्या मृत्यूचे तांडव सुरूच असून गेल्या दोन महिन्यात कुपोषणामुळे 39 बालकांचा मृत्यू झाल्याची माहिती सोमवारी याचिकाकर्त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात दिली.
या माहितीची दखल न्या. अनिल मेनन आणि न्या. मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने घेत सर्व प्रतिवादी आणि याचिकाकर्त्यांनी एकत्रित बैठक घेऊन तोडगा काढावा अशी सूचना केली.
मेळाटातील कुपोषणामुळे होणारे बालमृत्यू रोखण्यात यावे म्हणून सामाजिक कार्यकर्ते बंडू साने आणि डॉ. राजेंद्र बर्मा यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सोमवारी सुनावणी झाली. यावेळी राज्य सरकारने डॉ. दोर्जे यांनी सादर केलेल्या अहवालाचा अभ्यास करत असल्याचे सांगितले. तर याचिकाकर्त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केलेल्या परिस्थितीची माहिती सादर केली.
जव्हार, पालघर, मोखाडा या परिसरात मुलं आणि गर्भवती मातांसाठी सेंटर उभारण्यात आली आहेत. आदिवासींसाठी आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी त्या-त्या भागात जागाही देण्यात आल्या आहेत. पण काम करायला कोणी नाही.
या संदर्भात अनेक अहवाल, रिपोर्ट सादर झाले आहेत. पण अद्याप हवी तशी सुधारणा होत नसल्याची खंत याचिकाकर्ते बंडू साने यांनी व्यक्त केली. त्यावर न्यायालय म्हणाले, तुम्ही स्थानिक पातळीवर काम करता. तुम्ही उपाय सुचवणे गरजेचे आहे. जव्हार, पालघर, मोखाडामधील परिस्थितीची माहिती द्या.