शिवसेना वाचवण्यासाठी आम्ही ‘उठाव’ केला : गुलाबराव पाटील | पुढारी

शिवसेना वाचवण्यासाठी आम्ही ‘उठाव’ केला : गुलाबराव पाटील

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठी माणसाच्या हक्कांसाठी आणि हिंदुत्वाचं रक्षण करणारी संघटना म्हणजे शिवसेना. बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाने प्रभावित होऊन आम्ही संघटनेत आलो. लोकांची सेवा करण्यासाठी सत्ता हे साधन समजून काम करावं लागेल अशी शिकवण बाळासाहेबांनी दिली. महाविकास आघाडी सरकरमधून बाहेर पडल्यानंतर आमच्यावर अनेकांकडून बंड केल्याची टीका होत आहे. आम्हाला जे मिळालं आहे बाळासाहेबांमुळे मिळालं आहे. आम्ही बंड केलेलं नाही तर उठाव केला आहे, अशी आक्रमक भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील आमदार गुलाबराव पाटील यांनी मांडली. विधानसभा अधिवेशनात ते बोलत होते.

गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, फडणवीस मुख्यमंत्री असताना नगर पंचायत निवडणुकांमध्ये भाजपा पहिल्या स्थानावर होती. नी आमचा मुख्यमंत्री असताना शिवसेना चौथ्या क्रमांकावर फेकली गेली. शिवसेना रसातळाला चाललीय तिला वाचवण्यासाठी आम्ही उठाव केला. एकनाथ शिंदेंसोबत २० आमदार गेले. आम्ही रुग्णवाहिकेतून गेलो, आम्हाला उठाव करायचा होता. बाळासाहेब आमच्या मनात होते आणि राहतील. भाजपासोबत युती राहावी यासाठी आम्ही प्रयत्न केले. शिंदे तर पाच वेळा गेले. फटाक्याची वात आत्ता लागलेली नाही. आमदारांची नाराजी आम्ही सांगत होतो. कोणी फोन उचलायचे नाही. अजित पवार सकाळी सहा वाजता यायचे, त्यांचा हेवा वाटायचा अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

आपल्यावरील टीकेला प्रत्युत्तर देत गुलाबराव पाटील यांनी आपल्या भाषणातून नाव न घेता संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, मी पान टपरीवाला म्हणून टीका केली गेली. पण तुम्हाला सांगतो, धीरुभाई अंबानीही पेट्रोल पंपावर पेट्रोल भरायचे, आमचे मुख्यमंत्रीही रिक्षा चालवायचे. हा इतिहास आहे, अशी आठवण यावेळी त्यांनी करून जोरदार टोला लगावला.

भास्कर जाधवच्या आरोपांचा समाचार घेत गुलाबराव पाटील यांनी त्यांना झापले. ते म्हणाले की, आम्हाला मंत्री केलं हे उपकार आहेत. भास्कर जाधव यांनी चिंता कऱण्याची गरज नाही. आम्ही बाळासाहेबांची शिवसेना जिवंत ठेवणार आहोत. आच्यावर गटारीचं पाणी, प्रेतं अशा खालच्या स्तरावरील टीका करण्यात आली. आम्ही काही लेचेपेचे नाही. हातात जोर असणारा माणूस येतो आणि सत्तेत सामील होतो असा इशारा गुलाबराव पाटील यांनी दिला. शिवसेना संपत असेल तर ती वाचवण्याची जबाबदारी आमची आहे असंही ते म्हणाले.

आम्ही शिवसेनेतच आहोत त्यामुळे निवडणुका हरण्याचा प्रश्न येत नाही असं गुलाबरावांनी अजित पवारांना उत्तर दिलं. ४० आमदार फुटतात ही आजची आग नाही. आम्हाला आमचं घर सोडण्याची, बाळासाहेबांना त्यांच्या मुलाला दु:ख देण्याची आमचीही इच्छा नाही असं ते म्हणाले. सर्व आमदार साहेबांना त्रास सांगण्यात जात होते. पण चहापेक्षा किटली गरम. आम्ही काय सहजपणे आमदार झालेलो नाहीत. भगवा हातात घेऊन इथपर्यंत आम्ही इथपर्यंत पोहोचलो आहोत असंही गुलाबराव पाटील म्हणाले.

शिवसेनेच्या बंडखोर गटाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने आज विश्वासदर्शक ठराव जिंकला. २८७ आमदारांपैकी १६४ मते शिंदे सरकार मिळाली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने बहुमत चाचणी जिंकली. भाजपचे ज्येष्ठ आमदार माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि शिवसेनेच्या शिंदे गटाचे मुख्य प्रतोद भरत गोगावले यांनी शिंदे सरकारच्या बहुमताचा प्रस्ताव विधानसभेत मांडला. सरकारच्या विरोधात ९९ जणांची मतदान केले. दरम्यान, विधानसभेच्या बहुमत चाचणीत आज २० आमदार गैरहजर होते. दरम्यान बहुमत चाचणीनंतर सभागृहातील नेत्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचे अभिनंदन केले. यावेळी भाषण करताना अनेकांनी टोलेबाजी केली.

Back to top button