नवीन सरकारचं करायचं काय; खाली डोकं वरती पाय; 'आरे' विरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक | पुढारी

नवीन सरकारचं करायचं काय; खाली डोकं वरती पाय; 'आरे' विरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

जोगेश्वरी : पुढारी वार्ताहर : सेव्ह आरे जिंदाबाद, हमारा जंगल जिंदाबाद, आरे हमारी जान है, आरे हमारी पहचान है.. नवीन सरकारचं करायचं काय; खाली डोकं वरती पाय, अशा घोषणा देत शेकडो पर्यावरण प्रेमींनी आरे मेट्रो कारशेड पिकनिक पॉईंट परिसर रविवारी दणाणून सोडला. मेट्रो कारशेड पुन्हा गोरेगावच्या आरेमध्येच उभारण्याचा निर्णय एकनाथ शिंदे सरकारने घेतल्याने त्याविरोधात पर्यावरणवादी एकवटले असून, त्यांच्यासोबत आदिवासीही आंदोलनात उतरले आहेत.
आरेला कारे करणारच, असे म्हणत सकाळी 11 वाजता आरेच्या पिकनिक स्पॉटवर हे आंदोलक मोठ्या संख्येने जमले होते. या आंदोलनात शिवसेना, आम आदमी पार्टी, आदिवासी बांधव, वॉचडॉग फाऊंडेशन, अनेक स्वयंसेवी संस्था, तीनशे ते चारशे पर्यावरणप्रेमी सहभागी झाले होते.

शिवसेनेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी, आम आदमी पार्टीच्या प्रभारी प्रीती मेनन यांनी या आंदोलनात सहभाग घेतला. सकाळी साडे अकराच्या सुमारास आम आदमी पार्टीच्या वतीने मेट्रो कारशेडच्या ठिकाणी हनुमान चालिसा पठण करण्यात आली. देवेंद्र फडणवीस यांना सद्बुद्धी देवो आणि आरे जंगल वाचाव यासाठी हनुमान चालिसा पठण केल्याचे शर्मा यांनी सांगितले.

या नवीन सरकारने मुंबईकरांचा विश्वासघात केला असून, रस्त्यावर आमच्याशी लढाई करा, संसदेमध्ये लढाई करा, पण मुंबईत आम्ही हे पाप होऊ देणार नाही. आम्ही आरे वाचवण्याचे काम केले, मात्र आरेला संपवण्याच काम होत असून, हे हिंदुत्ववादी सरकार नाही, असा आरोप खासदार चतुर्वेदी यांनी केला.

Back to top button