शिंदे सरकार सहा महिन्यात कोसळेल, मध्यावधी निवडणुकांच्या तयारीला लागा : शरद पवार | पुढारी

शिंदे सरकार सहा महिन्यात कोसळेल, मध्यावधी निवडणुकांच्या तयारीला लागा : शरद पवार

मुंबई : पुढारी वृत्तसेवा :  मंत्रिमंडळ विस्तारानंतर मोठ्या प्रमाणात होणार्‍या नाराजीमुळे शिंदे सरकार अवघ्या सहा महिन्यात कोसळेल, असे भाकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी केले. मंत्रिपदाच्या नाराजीमुळे बंडखोर आमदार पुन्हा शिवसेनेत परतणार आहेत. त्यामुळे आतापासूनच मध्यावधी निवडणुकीच्या तयारीला लागा, असे आदेशही त्यांनी आपल्या आमदारांना दिले. शिंदे सरकारच्या सोमवारी होणार्‍या शक्‍तीपरीक्षेच्या पूर्वसंध्येला यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मध्ये आयोजित राष्ट्रवादी आमदारांच्या बैठकीत ते बोलत होते.

पवार म्हणाले, आपण विरोधी बाकावर बसणार असलो  तरी मतदार संघात जास्तीत जास्त वेळ द्या. मतदार संघात केल्या जाणार्‍या कामावरच तुम्हाला निवडून दिले जाते. आतापर्यंत काही जणांचा अपवाद वगळता बंडखोर निवडून आलेले नाहीत. शिवसेनेच्या या बंडखोर आमदारांचीही तीच अवस्था होऊ शकते. शिंदे सरकारमधील नाराजांची फौज मोठी आहे. ही नाराजी लवकरच उघड होताना पहायला मिळेल, असा दावाही त्यांनी केला. आता भाजपाकडून विरोधक आमदारांना लक्ष्य केले जाईल. मात्र, कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्याची तयारी आमदारांनी ठेवली पाहिजे, असेही पवार म्हणल्याचे समजते.

पवारांनी बोलविल्या आमदारांच्या बैठकीत विधानसभा विरोधी पक्ष नेत्याचे नाव जाहीर होण्याची शक्यता होती. हा नेता निवडण्याची जबाबदारी पवारांनी जयंत पाटील, हसन मुश्रिफ आणि छगन भुजबळ या ज्येष्ठ नेत्यांवर सोपवली, अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी बैठकीनंतर दिली. मात्र, या पदासाठी आमदारांनी अजित पवार यांचाच आग्रह धरल्याचे समजते.

Back to top button