डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्काराचा शासनाला विसर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर

मुंबई : प्रसाद जाधव :  डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार सोहळा सलग तीन वर्षे यंदाही होऊ न शकल्याने राज्य सरकारला या पुरस्काराचा विसर पडला आहे, अशी खंत सामाजिक कार्यकर्ते व्यक्‍त करत आहेत. यंदा छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीदिनी 26 मे रोजी विविध संस्थांना पुरस्कार देण्याची घोषणा करण्यात आली. पण, महाराष्ट्रातील राजकीय पेचामुळे पुरस्कार सोहळा पार पडला नाही.

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्यावतीने समाजातील विविध क्षेत्रात काम करणार्‍या नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था व उल्लेखनीय काम करणार्‍यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार दिला जातो. मागील दोन वर्षे कोरोनमुळे पुरस्कार देता आला नाही. यंदाही पुरस्कार सोहळा होऊ शकला नसल्याने शासनाला पुरस्काराचा विसर पडला काय? असा प्रश्न भारतीय युवा कलाकार संगीत साहित्यमंच या संस्थेने उपस्थित केला आहे.

कोरोना महामारीमुळे 2019 व 2020 या वर्षात डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार शासनाला देता आला नाही. आता कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने सामाजिक न्याय विभागाने 2019 ते 2022 या तीन वर्षाचे पुरस्कार देण्याची 3 मे रोजी जाहिरात दिली होती. निवड झालेल्या व्यक्तींना छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीदिनी 26 जूनला पुरस्कार देण्याचे निश्चित करण्यात आले. स्थळ, पुरस्कारार्थीच्या प्रस्तावाची अंतिम यादी तयार झाली असताना अचानक राजकीय पेच निर्माण झाल्याने कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचा आरोप भारतीय युवा कलाकार संगीत साहित्यमंचाकडून करण्यात आला आहे.

पुरस्कार मिळेल या आशेने ग्रामीण भागातून असंख्य संस्थाचालक, समाजसेवक, साहित्यिक, कलावंत मुंबईत दाखल झाले होते कोणतीही जाहिरात न देता कार्यक्रम रद्द झाल्याने त्यांच्यामधून संताप व्यक्त होत आहे. सामाजिक न्याय विभागाने लवकरात लवकर पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम हाती घेऊन लाभार्थ्यांना तो प्रदान करावा.
– अशोक रणदिवे, अध्यक्ष, भारतीय युवा कलाकार संगीत साहित्यमंच

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news