

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : मुंबईसह उपनगरांत शुक्रवारी सलग दुसर्या दिवशी पावसाने जोरदार हजेरी लावली. हिंदमाता, सायन, चेंबूर फाटक भागात मोठ्या प्रमाणावर पाणी तुंबले होते. शहरात अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या.
हिंदमातासह सायन रोड नंबर 24, चेंबूर फाटक, सुंदरबाग, कमानी व अन्य भागात पाणी तुंबले होते. रस्त्यावरील वाहतूक धीम्या गतीने सुरू होती. मुंबईकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.
काळबादेवी रोड महर्षी कर्वे रोड मोहम्मद अली रोड, डी. एन. रोड, नरिमन पॉईंट परिसर, धारावी, सायन आदी भागातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होती. एस. व्ही. रोडसह लिंक रोड, पश्चिम द्रुतगती महामार्ग वाहतूक कोंडीत सापडला होता. एलबीएस मार्गावरही वाहतूक कोंडी झाली होती.
मरे, परेच्या उपनगरीय गाड्या वेळापत्रकानुसार सुरू होत्या. प. उपनगरातही सरोदा पाडा, वीरा देसाई रोड आधी भागात पाणी तुंबले होते. चार ठिकाणी घर पडल्याच्या किरकोळ तक्रारींसह 23 ठिकाणी झाड व झाडाच्या फांद्या पडल्या. दोन ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्याचे आपत्कालीन विभागाकडून सांगण्यात आले.
ठाण्यात पडझडीच्या घटना
ठाणे शहर व जिल्ह्यात किरकोळ पडझडीच्या घटना घडल्या. आंबेघोसाळे तलावच्या बाजूला, रुची चायनीज हॉटेलच्यामागे झाडाची फांदी घरावर पडली. पाचपाखाडीतील अमर ज्योती सोसायटी जवळ (भक्ती मंदीर), मुंब्रा रेल्वे स्टेशन जवळ, सेंटजॉन स्कूल समोर, मुंब्रा. येथे झा़डाच्या फांद्या पडल्याच्या घटना घडल्या.
कोपरखैरणेत झाड कोसळले
कोपरखैरणे सेक्टर 1 व ऐरोली येथील पटनी रस्त्यावर झाड कोसळण्याची घटना घडल्या.नवी मुंबईतील ठाणे बेलापर मार्गासह, सायन पनवेल महामार्ग, एमआयडीसीतील रस्ते जलयम झाले होते. महापे उड्डाणपुलाखाली वाहतुक कोंडी झाली होती.
धारावीत घरांच्या भिंती कोसळल्या दोन घरांच्या भिंती एकाचवेळी कोसळल्याची घटना धारावी नव्वद फूट रोड गांधी चौकालगत नवरंग सोसायटीमध्ये घडली. घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाच्या मदतीने शेजार्यांनी अडकलेल्या 13 जणांना सुखरूप घराबाहेर काढले. नवरंग सोसायटीतल्या सखल भागात पाणी साचू लागल्याने पीडित इर्शाद खान आणि इम्रान खान यांनी आपल्या कुटुंबासह घरीच राहण्याचा निर्णय घेतला होता. सकाळी 6 च्या सुमारास भिंतीचा भार या घरांच्या गंजलेल्या लोखंडी अँगलला सहन न झाल्याने ही घटना घडली.