सरकार आणि शिवसेनेत संघर्षाची पहिली ठिणगी? आरे कारडेपो : पर्यावरणवादीही आक्रमक | पुढारी

सरकार आणि शिवसेनेत संघर्षाची पहिली ठिणगी? आरे कारडेपो : पर्यावरणवादीही आक्रमक

मुंबई : पुढारी वृत्तसेवा :  मेट्रो-3 प्रकल्पाचा कारडेपो आरे कॉलनीत करण्याचा निर्णय एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने घेतल्याने आरेच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि सरकारमध्ये संघर्षाची पहिली ठिणगी पडणार अशी शक्यता दिसू लागली आहे. आरेत कारडेपो करू नका, असे आवाहन शुक्रवारी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारला केले, तर दुसरीकडे पर्यावरणवाद्यांनी पुन्हा एकदा ‘आरे वाचवा’ची हाक दिली आहे.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना कारडेपो आरेत करण्याचा निर्णय झाला होता. त्यानंतर ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर या निर्णयाला स्थगिती दिली. कारडेपो कांजूरमार्ग येथे करण्याचा निर्णय ठाकरे यांनी घेतल्यानंतर कांजूरच्या जागेवर लगेच केंद्रातील भाजप सरकारने दावा सांगितला होता. हे प्रकरण सध्या न्यायालयात आहे.

नव्या सरकारमध्ये पदभार हाती घेतल्यानंतर कारडेपो आरेत करण्याच निर्णय जाहीर केला. कारडेपो आरेत करण्यास सरकार तयार असल्याची भूमिका न्यायालयात मांडण्याची सूचना राज्याच्या महाधिवक्त्यांना देण्यात आली. शुक्रवारी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन आरेत कारडेपो उभारून पर्यावरणाचे नुकसान करू नये, असे आवाहन सरकारला केले. मात्र सरकार भूमिकेवर ठाम राहिल्यास आणि आरे प्रकरणी शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतल्यास सरकार आणि शिवसेना यांच्यात संघर्षाची पहिली ठिणगी पडेल. अजून तरी तसे स्पष्ट संकेत मिळालेले नाहीत.

दुसरीकडे आरेत कारडेपो करण्याच्या निर्णयाविरोधात पर्यावरणवादी संघटना आक्रमक होऊ लागल्या आहेत. सरकारच्या निर्णयाविरोधात पुन्हा एकदा आंदोलन छेडण्याचा इशारा वनशक्ती संघटनेचे प्रमुख दयानंद स्टॅलिन यांनी दिला. कारडेपो आरेत केल्यास पुन्हा एकदा ‘आरे वाचवा’ असा नारा देत आंदोलन पुकारू, असे ते म्हणाले.

मेट्रो शेड आरे कॉलनीतच

मेट्रोची शेड ही आरे कॉलनीत होईल. या शेडचे 25 टक्के काम पूर्ण झाले आहे. आरेतील मेट्रो शेड हलवण्याचा आधीच्या सरकारचा निर्णय चुकीचा होता. त्यांनी या विषयावर इगो केला. त्यामुळे काम रखडले. नवीन जागा मिळविण्यासाठी अनेक वर्षे गेली असती. पण आम्ही आता तातडीने काम मार्गी लावू आणि मुंबईकरांसाठी मेट्रो सेवा लवकर सुरू होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Back to top button