सलग दुसर्‍या दिवशी लोकलची संथगती सुरूच | पुढारी

सलग दुसर्‍या दिवशी लोकलची संथगती सुरूच

मुंबई : पुढारी वृत्तसेवा :  मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि आजूबाजूच्या परिसरात गुरुवार पहाटेपासून बरसायला लागलेल्या पावसाने शुक्रवारीदेखील आपला जोर कायम ठेवला. त्यामुळे सलग दुसर्‍या दिवशी लोकलच्या वेळापत्रकाचे तीनतेरा वाजले. शुक्रवारी पहाटेपासून रात्रीपर्यंत मध्य रेल्वेवरील हार्बर आणि मेन लाईनवरील लोकलची वाहतूक 15 ते 20 मिनिटे विलंबाने सुरू राहिली. पश्चिम रेल्वेवरील लोकलचे वेळापत्रक मात्र सुरळीत राहिले.

काही दिवसापासून रुसून बसलेल्या पावसाने गुरुवारपासून चांगलाच जोर पकडला आहे. मध्य रेल्वेवरील लोकलला याचा फटका बसला. दहा ते पंधरा मिनिट लोकल विलंबाने धावल्या. सकाळपासूनच ही परिस्थती निमार्ण झाली होती. त्यामुळे सकाळी कामावर निघालेल्या प्रवाशांना लेटमार्क सहन करावा लागला. सायंकाळी परतीच्यावेळीही प्रवाशांना या त्रासाला सामोरे जावे लागले.
पावसामुळे रेल्वे ट्रॅकवर काही ठिकाणी पाणी जमा झाले. पण त्याचा फारसा परिणाम झाला नाही. किरकोळ पाण्यातून वाट काढत लोकल संथगतीने धावत होत्या.

गुरुवारी झालेल्या सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळे मध्य रेल्वेवरील 100 पेक्षा जास्त लोकल विस्कळीत झाल्या, तर 15 लोकल रद्द केल्या. गुरुवारी सायंकाळी मध्य रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेत पाणी शिरण्यास सुरुवात झाली. सीएसएमटी, मशीद रोड, भायखळा, दादर ते परेल, तसेच हार्बरवरील गोवंडी, वडाळा स्थानकाच्या दरम्यानची सिग्नल यंत्रणा गुरुवारी रात्री 8.45 च्या सुमारास कोलमडली. त्यामुळे सीएसएमटीला येणार्‍या आणि जाणार्‍या लोकल विलंबाने धावत होत्या. मात्र सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळे बराच वेळ कुर्ला ते सीएसएमटी स्थानकदरम्यान दोन्ही धीम्या मार्गांवर लोकलच्या रांगा लागल्या होत्या.

पारंपरिक पद्धतीने सिग्नल यंत्रणा हाताळताना रेल्वे कर्मचार्‍यांना कसरत करावी लागली. त्यासाठी बराच वेळ लागल्याने लोकल अर्धा ते एक तास विलंबाने धावत होत्या. सीएसएमटी ते ठाणेदरम्यान धीम्या लोकलमधून प्रवास करण्यासाठी एरवी एक तास लागतो. मात्र या प्रवासासाठी गुरुवारी रात्री दोन ते अडीच तास लागले. त्यामुळे कल्याण आणि त्यापुढील स्थानक गाठण्यासाठी काही प्रवाशांना मध्यरात्र झाली. सीएसएमटी ते पनवेल हार्बर मार्गांवरही अशीच परिस्थिती होती. सिग्नल समस्येमुळे मध्य रेल्वे मुख्य मार्ग आणि हार्बरवरील 100 लोकल फेर्‍या विलंबाने धावल्या, तर 15 फेर्‍या रद्द केल्या.

Back to top button