…तर वॉर्ड अधिकार्‍यांवर कारवाई

…तर वॉर्ड अधिकार्‍यांवर कारवाई

मुंबई : पुढारी वृत्तसेवा :  सर्व यंत्रणांनी आपापसात योग्य समन्वय ठेऊन कोणत्याही परिस्थितीत आपत्तींमध्ये जीवितहानी होणार नाही याची दक्षता घ्यावी असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. तर धोकादायक इमारतींमुळे होणारी मनुष्यहानी टाळण्यासाठी महापालिकांनी अशा इमारतीतील रहिवाशांना तात्पुरत्या निवा-याची सोय करावी असे आदेश देण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.धोकादायक इमारतींना नोटीस न देणा-या वॉर्ड ऑफिसरवर कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आल्याचे ते म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयातील समिती सभागृहात राज्यातील आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा घेणारी बैठक झाली.
या बैठकीला विभागीय आयुक्त,जिल्हाधिकारी,महापालिकांचे आयुक्त,सैन्यदल,रेल्वे आदी खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी व पालिका कार्यालयांमधील वॉर रुम यंत्रणा सज्ज राहून लोकांच्या तक्रारींचा तातडीने निपटारा करावा. गेल्या वर्षी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या होत्या. विशेषत: नेहमी दरड कोसळणार्‍या जागांव्यतिरिक्त नव्या ठिकाणी या दरडी कोसळल्या. त्यामुळे यंदा देखील अधिक दक्ष राहण्याची गरज आहे.धोकादायक इमारतींमधील रहिवाशांना मोठ्या पावसाच्या वेळेस तात्पुरत्या निवार्‍यांमध्ये हलवून त्या ठिकाणी त्यांना जेवण्याखाण्याची व्यवस्था करण्याची जबाबदारी पालिकांनी घ्यावी. तसेच मी आणि उपमुख्यमंत्री चोवीस तास आपणा सर्वांसाठी उपलब्ध असून आपल्याला गतीमानतेने शेवटच्या घटकांपर्यंत शासनाच्या योजना पोहचविल्या पाहिजेत असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

एखादी घडणारी दुर्घटना टाळणे आपल्या हातात नसते मात्र त्यानंतर करण्यात येणारे बचाव व मदतकार्य वेगवान असावे असे सांगून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुंबईत पावसाळयात इमारती कोसळत असतात. अशा इमारतींना नोटीस देउनही त्या खाली केल्या जात नाही.पालिकेने अशा इमारतीतील रहिवाशांना तात्पुरते निवारे उपलब्ध करून दयावेत.तसेच जर इमारत धोकादायक असूनही जर वॉर्ड ऑफिसरने त्या इमारतीला नोटीस दिली नसेल आणि दुर्घटना घडली तर अशा वॉर्ड ऑफिसरवर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.मनुष्यहानी कशी टाळता येईल याचा आराखडा तयार करण्याच्या सूचना आयुक्तांना देण्यात आल्याचेही ते म्हणाले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news