मुंबईच्या काळजात कट्यार खुपसू नका

मुंबईच्या काळजात कट्यार खुपसू नका

मुंबई : पुढारी वृत्तसेवा :  माझ्यावर राग आहे तर तो माझ्यावर काढा. माझ्या पाठीत वार करा; पण मुंबईच्या काळजात कट्यार खुपसूू नका. आरेचा जो निर्णय नव्या मुख्यमंत्र्यांनी बदलला, त्याचे मला दु:ख झाले आहे, अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपली नाराजी व्यक्‍त केली.

शपथ घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारचा मेट्रो कारशेडचा आदेश फिरविला. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले, हा कोणाचा खासगी प्लॉट नाही. कोणत्याही बिल्डरला तो आंदण दिलेला नाही. तिथे जी काही पर्यावरणासाठी आवश्यक वनराई
आणि जंगले होती, त्यातील अनेक झाडांची एका रात्रीत कत्तल केली गेली.

आरेमध्ये काही वन्यप्राणी दिसले. बिबट्याचे दर्शन झाल्याच्या बातम्या आपण पाहिल्या. मुख्यमंत्री झाल्यानंतर त्याला स्टे दिला होता. मी मुंबईच्या विकासाआड आलो नाही आणि येणारही नाही, असेही उद्धव म्हणाले.

आरेऐवजी कांजूरमार्गचा पर्याय सुचवला. त्यात कुठेही अहंकार नाही. मी मुंबईकरांच्या वतीने विनंती करतोय की, आरेचा आग्रह रेटू नका, जेणेकरून पर्यावरणाला हानी पोहोचेल. कदाचित त्यांना वाटत असेल, त्यांचे बरोबर आहे; पण मी पर्यावरणवादी आणि पर्यावरणासोबत आहे. मुंबईच्या पर्यावरणाशी खेळू नका, असे आवाहनही ठाकरे यांनी केले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news