

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : गुवाहाटी येथे मुक्कामी असलेल्या एकनाथ शिंदे समर्थक आमदारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शेवटचा अल्टिमेटम दिला आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडून भाजपसोबत सत्ता स्थापन करा. अन्यथा आम्ही कोणाच्या संपर्कात गेल्यास तुमची संधी जाईल. तुम्ही भाजपशी चर्चा केली नाही तर आम्हाला ती करावी लागेल, असा अल्टिमेटम शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार दीपक केसरकर यांनी मंगळवारी दिला.
सर्व 50 आमदार स्वतःच्या मर्जीने आणि एक विचार घेऊन गुवाहाटीत आले आहेत. आम्ही आमचे सर्वाधिकार हे एकनाथ शिंदे यांना दिले आहेत. पण, अजूनही उद्धव ठाकरे हे आमचे पक्षप्रमुख आहेत. त्यांनी शिवसेना फुटण्यापासून वाचवावी. त्यांनी अजूनही आपले भाजपश्रेष्ठींशी असलेले संबंध पाहता त्यांच्याशी चर्चा करावी आणि भाजपसोबत सरकार स्थापन करावे. पण उद्धव यांनी लवकर ही भूमिका घेतली नाही आणि आम्ही जर कोणाला बांधील झालो तर आम्हालाही परत येता येणार नाही, असे केसरकर म्हणाले.
आम्ही उद्धव ठाकरे यांना काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडा, असे सांगत आहोत. मग हे दोन पक्ष सोडले तर भाजपचा एकमेव पर्याय उरतो. त्यामुळे आम्ही भाजपसोबत चर्चा करू, असेही त्यांनी स्पष्ट केले.