मुंबई : वृत्तसंस्था : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 21 आणि 22 जूनला राजीनामा देण्याची तयारी केली होती. मात्र त्यांना राजीनामा देण्यापासून शरद पवार यांनी रोखले असल्याची माहिती भाजपच्या विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.
एकनाथ शिंदे बंडखोरी करत थेट सुरतला पोहचले होते. त्यानंतर शिवसेनेच्या दिग्गज नेत्यांनी बंडखोरी करत शिंदे गटात सामिल होण्याचा निर्णय घेतला. सुरत वारीनंतर गुवाहाटी येथे राजकीयनाट्याला सुरूवात झाली. या कालावधीमध्ये महाविकास आघाडी सरकार कोसळणार अशी चर्चा जोर धरु लागली होती. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यातील जनतेला संबोधीत करत आपण मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यास तयार आहे. मी आजच माझा मुक्काम वर्षावरुन मातोश्रीवर हलवत आहे, असे भावनिक आवाहन केले होते.
ठाकरे यांच्या ऑनलाईन संवादानंतर शरद पवार, खा. सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड यांनी त्यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. त्यांच्यात एक तास चर्चा झाली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजीनामा देण्याच्या तयारीत होते, पवार यांनी त्यांना राजीनामा देण्यापासून रोखले. असे वृत्त एका वृत्त वाहिनीने दिले आहे.