निधीअभावी रखडला 19 रेल्वेस्थानकांचा विकास | पुढारी

निधीअभावी रखडला 19 रेल्वेस्थानकांचा विकास

मुंबई : पुढारी वृत्तसेवा :  प्रवाशांना अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी मध्य रेल्वे, हार्बर मार्ग आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील 19 रेल्वे स्थानकांचा विकास करण्याचे काम मुंबई रेल्वे विकास महामंडळ (एमआरव्हीसी) करणार आहे. परंतु हा पुनर्विकास निधीची चणचण असल्याने रखडला आहे. एमआरव्हीसीने फक्त निविदाकारांच्या सहभागाचीच प्रक्रिया राबवली. त्यापुढील निविदा देण्यासह अन्य प्रक्रिया रेंगाळल्या आहेत. प्रत्यक्षात राज्य सरकारकडून आणखी निधी देण्यासंदर्भात लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत ही प्रक्रिया राबविणे शक्य नाही.
रेल्वे मंत्रालयाकडेही पुन्हा निधीची मागणी होत असून खासगी बँकांकडूनही निधी मिळवण्यासंदर्भात प्रयत्न सुरु आहेत. कोरोनाकाळापूर्वी उपनगरीय रेल्वे मार्गावरुन दररोज सुमारे 75 लाख प्रवासी प्रवास करीत होते. आता 65 लाख प्रवास करतात. उपनगरीय स्थानकातील सुविधा अपुर्‍या आहेत. अरूंद प्लटफार्म, त्यातच प्लटफार्मवर जागा अडवणारे स्टॉल यामुळे प्रवाशांना चालणेही कठिण होते. त्यात अपुरे पादचारी पूल, सरकते जिने, प्रसाधनगृहांची कमतरता व त्यांची स्वच्छता हे प्रश्नही आहेत. त्यामुळेच एमआरव्हीसीमार्फत एमयुटीपी 3 ए मधील मध्य रेल्वे मार्गावरील ठाणे, डोंबिवलीसह एकूण सात, हार्बरवरील चेंबूर, गोवंडीसह चार आणि पश्चिम रेल्वेवरील मुंबई सेन्ट्रल, जोगेश्वरी, कांदिवली यासह एकूण आठ स्थानकांचा विकास करण्यात येणार आहे.

यामुळे स्थानकांवर अनेक सुविधांची भर पडेल. परंतु 2019 पासून या प्रकल्पाची नुसतीच चर्चा सुरु आहे. प्रकल्प राबवताना येणार्‍या अडचणी, तसेच नेमक्या कोणत्या सुविधा प्रवाशांना अपेक्षित आहेत, याचा अभ्यास करण्यासाठी मार्च 2020 मध्ये नेमलेल्या सल्लागाराने एमआरव्हीसीला आपला अहवालही दिली. त्यानंतरही स्थानकांच्या विकास कामांना गती मिळालेली नाही.

त्यातच राज्य सरकारने गेल्या तीन वर्षात एक हजार कोटी रुपयांचा निधी दिला नसल्याने एमआरव्हीसीच्या एमयुटीपी 2 आणि 3 मधील प्रकल्पांची कामे ठप्प झाली आहेत. राज्य सरकारशी सतत चर्चा केल्याने गेल्या महिन्याभरात फक्त 300 कोटी रुपये एमआरव्हीसीला मिळाले आहेत. मात्र मध्य आणि पश्चिम उपनगरीय रेल्वेवर एमआरव्हीसी कडून 33 हजार 690 कोटी रुपयांचा एमयुटीपी-3 ए प्रकल्प राबविला जात आहे. या प्रकल्पालाही एमएमआरडीएने निधी देण्यास असमर्थता दर्शविली आहे. तसे पत्रच नगरविकास विभागाला दिले आहे. त्यामुळे एमयुटीपी-3 ए मध्ये समाविष्ट असलेल्या 19 स्थानकांचा विकास आणखी रखडण्याची चिन्हे आहेत. एमआरव्हीसीने सध्या फक्त निविदाकारांच्या सहभागाची प्रक्रिया राबवली असून निधी त्वरीत मिळण्याची शक्यता नसल्याने कंत्राटदारांना निधीही देणार कसा असा सवाल उपस्थित होतो.

19 स्थानके कोणती

मध्य रेल्वे : भांडुप, मुलुंड, ठाणे, डोंबिवली, शहाड, नेरळ, कसारा
हार्बर मार्ग : जीटीबी नगर, चेंबूर, गोवंडी, मानखुर्द
पश्चिम रेल्वे : मुंबई सेन्ट्रल (लोकल), खार रोड, जोगेश्वरी, कांदिवली, मिरा रोड, भाईंदर, वसई रोड, नालासोपारा

Back to top button