

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : मुंबईतून काही आमदारांना जबरदस्ती गुवाहाटीला नेले आहे. पण जे हृदयाने-मनाने आपल्यात आहेत, त्यांच्यासाठी शिवसेनेचे दरवाजे खुले आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले पंधरा बंडखोर आमदार शिवसेनेच्या संपर्कात आहे, असा दावा शिवसेना नेते पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी रविवारी केला.
वाकोला येथे शिवसेना विभाग क्रमांक सहामधील शिवसेना कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता. त्यावेळी आदित्य ठाकरे बोलत होते. यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले, 20 मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचे आहे का, असे विचारले होते. तेव्हा रडारड केली आणि 20 जून रोजी त्यांनी बंडखोरी केली. एकनाथ शिंदे यांना क्रमांक दोनचे नगरविकास खाते दिले. रस्ते विकास महामंडळ दिले. त्यांना पक्षात मानसन्मान होता. पण तिथे गेलेल्या बंडखोरांना मान व हात पकडून कैद्यासारखे सुरत ते गुवाहाटी फरफटत नेले.
त्याचा व्हिडीओही सर्वांनी पाहिला. एकनाथ शिंदे व बंडखोरांना महाराष्ट्र माफ करणार नाही, असे आदित्य ठाकरे म्हणाले. ज्यांना तिथे जायचे असेल त्यांनी खुशाल जावे. जे शिवसेनेचे नव्हते त्यांना शिवसेना नव्हे, तर महाराष्ट्राचे दरवाजे बंद आहेत, असेही आदित्य ठाकरे यांनी सांगितले. एखादे बंड विरोधी पक्षातून सत्ताधारी पक्षाकडे जाण्यासाठी होते. पण सत्ताधारी पक्षातून विरोधकांमध्ये जाण्यासाठी झालेले हे एकमेव बंड आहे. पण त्यांना विरोधी बाकांवरच बसावे लागेल, असा इशाराही आदित्य ठाकरे यांनी दिला.
तुम्ही आम्हीच शिवसेना म्हणून सांगता, पण शिवसेनेचे नाव घेण्याची तुमची लायकी नाही. शिवसेनेचे रक्त, लाज व स्वाभिमान असता तर सुरतहून गुवाहाटीला पळाले नसतात. तुमच्यात हिंमत असती तर ठाणे-मुंबईत राहून बंड करायचे होते. महाराष्ट्रात बंड करायची हिंमत नाही म्हणून बाहेर पळाले. अन्यथा समोर येऊन सांगितले असते, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.
प्रकाश सुर्वे यांचे मला आश्चर्य वाटते, त्यांची सर्व कामे केली, फंड दिला. दिलीप लांडे हे तर माझ्या हातात हात घेऊन रडले. मी सोबत असल्याचे सांगितले, तर लांडे कसे जाऊ शकतात, असा सवाल त्यांनी केला. बंडखोर आमदारांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी राजनीमा द्यावा आणि निवडणुकीला सामोर जावे. या बंडखोरांना पुन्हा विधानसभेची पायरी चढू देणार नाही, असा इशाराही आदित्य ठाकरे यांनी दिला.