आमदारांच्या पुतळ्यांचे दहन
आमदारांच्या पुतळ्यांचे दहन

एकनाथ शिंदेंसह 3 आमदारांच्या पुतळ्यांचे दहन

नवी मुंबई : पुढारी वृत्तसेवा :   सध्या राज्यभर गाजत असलेल्या शिवसेनेच्या राजकीय घडामोडींबाबत बंडखोर आमदारांना धडा शिकवण्यासाठी शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे. याचाच भाग म्हणून रायगड जिल्हा शिवसेनेतर्फे शनिवारी बंडखोर आमदारांचे नेतृत्व करणारे मंत्री एकनाथ शिंदे तसेच जिल्ह्यातील तीन बंडखोर आमदारांच्या प्रतीकात्मक पुतळ्यांचे दहन करण्यात आले. यावेळी संतप्त शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करून बंडखोरांचा खरपूस समाचार घेतला.
शिवसेना रायगड जिल्हा कमिटीतर्फे पनवेल, उरण, कर्जत-खालापूर, पेण-अलिबाग सह सर्व तालुक्यांतील पदाधिकार्‍यांची बैठक खारघर येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालय आयोजित करण्यात आली. यावेळी संपर्कप्रमुख तालुकाप्रमुख, युवासेनेचे प्रमुख, महिला आघाडीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. उपस्थित पदाधिकार्‍यांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना पूर्वीसारखाच आपला पक्ष सक्षम असल्याचा विश्‍वास द्यावा, जेणेकरून शिवसैनिकांमधील गैरसमज दूर होतील असा निर्धार करण्यात आला. तसेच एकनाथ शिंदे व त्यांचे सर्व समर्थक आमदार यांनी शिवसेना पक्षाशी केलेल्या गद्दारीबाबत जाहीर निषेध करण्यात आला. त्यानंतर आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी बंडखोरांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत रस्त्यावर उतरले.

यावेळी बंडखोरांचे नेते एकनाथ शिंदे व त्यांचे समर्थक असलेले रायगड जिल्ह्यातील आमदार महेंद्र दळवी, आमदार भरत गोगवले, आमदार महेंद्र थोरवे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यांचे दहन करून राग व्यक्त केला. यावेळी शिवसेना जिंदाबाद…, आवाज कुणाचा…, शिवसैनिक अंगार है…, आदी घोषणांनी शिवसैनिकांनी परिसर दणाणून सोडला.

बंडखोर आमदार विधानसभेचे तोंड पाहू शकणार नाहीत

बंडखोरांमध्ये सामिल झालेल्या कार्यकर्त्यांवर कारवाई केली जाईल. सुपारी घेऊन शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये दुफळी निर्माण करून शिवसेना पक्षाला बदनाम करण्याचे काम वृत्तवाहिन्या करत आहेत, अशी संतप्त भावना त्यांनी व्यक्त केली. रायगडातील बंडखोर तिन्ही आमदार भविष्यात विधानसभेचे तोंड बघू शकणार नाहीत, अशी आम्ही व्यवस्था करू, असा इशारा घरत यांनी दिला.

logo
Pudhari News
pudhari.news