गुवाहाटीत असलेल्या आमदारांच्या कुटुंबीयांना धमक्‍या ; ‘मुसेवाला’ करण्याचा प्रयत्न | पुढारी

गुवाहाटीत असलेल्या आमदारांच्या कुटुंबीयांना धमक्‍या ; ‘मुसेवाला’ करण्याचा प्रयत्न

मुंबई : पुढारी वृत्तसेवा :  गुवाहाटीत असलेल्या आमदारांच्या कुटुंबीयांना धमकावले जात आहे. त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. त्यांचा ‘मुसेवाला’ करण्याचा प्रयत्न केला जात आहे. राज्य सरकारने आमदारांच्या कुटुंबीयांची सुरक्षा व्यवस्था काढून घेतली, अशी तक्रार बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी केल्यानंतर गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी आमदारांच्या कुटुंबीयांना सुरक्षा व्यवस्था पुरविण्याचा आदेश दिला.

मुंबई, ठाण्यासह काही शहरांत बंडखोर आमदारांच्या कार्यालयांवर हल्ले करण्यात आले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी एक ट्विट करून आमदारांच्या कुटुंबीयांच्या जीविताला धोका असल्याचे म्हटले आहे. राज्य सरकारने जाणीवपूर्वक सुरक्षा व्यवस्था काढून घेतली आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे. सुरक्षा व्यवस्था काढून घेतल्यानंतर काय होते ते मुसेवाला प्रकरणातून दिसले आहे. राजकीय सूडबुद्धीतून संरक्षण काढून घेतले जात असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, या ट्विटनंतर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी बंडखोर आमदारांच्या कुटुंबीयांना सुरक्षा पुरविण्याचे आदेश दिले. आमदारांना शासनाकडून सुरक्षा व्यवस्था पुरवली जाते. त्यांच्या कुटुंबीयांना सुरक्षा नसते. मात्र सध्याचा राजकीय तणाव विचारात घेऊन त्यांच्या कुटुंबीयांना सुरक्षा व्यवस्था पुरविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

दुसरीकडे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्या ट्विटवर टीका केली. ते म्हणाले, हे आमदार महाराष्ट्रात असते तर त्यांना सुरक्षा पुरवली असती. मात्र ते दुसर्‍या राज्यात पळून गेले आहेत. त्यांना कशी सुरक्षा पुरवणार. बंडखोर गटाकडे आणि त्यांच्या नेत्याकडे समोर येऊन बोलण्याची धमक नाही, अशी टीका त्यांनी केली. शिवसैनिकांकडून होत असलेल्या तोडफोडीवर ते म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांनी कष्टाने उभा केलेला पक्ष कोणी तोडू पाहत असेल तर सर्वसामान्य शिवसैनिक कसा गप्प बसेल, असा सवाल त्यांनी केला.

Back to top button