सेनेच्या बंडखोर आमदारांचा ब्रेनगेम

सेनेच्या बंडखोर आमदारांचा ब्रेनगेम
Published on
Updated on

मुंबई : पीटीआय : सध्या गुवाहाटीत मुक्‍कामी असलेल्या शिवसेनेतील बंडखोर आमदारांनी मुंबई सोडताना आपल्या योजनेबद्दल कमालीची गोपनीयता बाळगली होती. पोलिस यंत्रणेला याचा कोणताही सुगावा लागू नये म्हणून त्यांनी आपापल्या अंगरक्षकांना वेगवेगळी कारणे देत चकवा दिला आणि सुरतचा रस्ता धरला, अशी माहिती एका पोलिस अधिकार्‍याने शनिवारी पीटीआयला दिली.

राज्यात सध्या सुरू असलेल्या सत्तानाट्यात आणखी काय समोर येणार, याची उत्सुकता लागलेली असतानाच शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंडखोर आमदारांनी सुरतला जाताना कशाप्रकारे यंत्रणा आणि आपल्या कार्यकर्त्यांच्या डोळ्यांत धूळ फेक केली, याचा उलगडा एका पोलिस अधिकार्‍याने केला आहे.

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील बहुतांश आमदारांना पोलिस संरक्षण होते. सुरतला रवाना होण्यापूर्वी या आमदारांनी अंगरक्षक आणि पोलिस कर्मचार्‍यास वैयक्‍तिक कामासाठी जात असल्याचे सांगितले. मी परत येईपर्यंत थांबा, असेही सांगितले. हे आमदार सुरतला जात असल्याची अंगरक्षकांना अजिबात कल्पना नव्हती. हे आमदार न परतल्याने त्यांच्या अंगरक्षकांनी वरिष्ठ अधिकार्‍यांना याची माहिती दिली. यातील मंत्री असलेले एकनाथ शिंदे, शंभूराज देसाई, अब्दुल सत्तार आणि संदिपान भुमरे यांच्या संरक्षणार्थ विशेष पोलिस अधिकारी नियुक्‍त आहेत. मात्र, त्यांनाही याची कल्पना नव्हती. ते बेपत्ता झाल्याची माहिती मिळेपर्यंत या सर्वांनी राज्याची सीमा ओलांडून गुजरातमध्ये प्रवेश केला होता.

गुप्तचर विभागाने केले सतर्क

शिवसेनेचे काही आमदार गेल्या काही महिन्यांपासून विरोधी पक्षातील नेत्यांच्या संपर्कात असल्याची माहिती गुप्तचर विभागाने दिली होती. मात्र, त्यावर काहीच कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे हे गुप्‍तचर यंत्रणेचे अथवा गृह विभागाचे अपयश म्हणता
येणार नाही, असे गृह मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकार्‍याने म्हटले आहे.

एक नारळपाणी पिता पिता पळाला;
दुसरा कार्यकर्त्यांना रस्त्यात सोडून पसार
बंडखोर आमदारांपैकी एकजण आपल्या कार्यालयात नारळ पाणी पित बसले होते. अचानक सोबतच्या कार्यकर्त्यांना आलो पाच मिनिटांत, असे सांगून ते तेथून निघून गेले. दुसरा किस्सा असा की, एक आमदार युवासेनेच्या पदाधिकार्‍यांसोबत कारमधून कामानिमित्त निघाले होते. रस्त्यात या पदाधिकार्‍यांना एक अर्जंट काम असल्याचे सांगत या आमदाराने त्यांना कारमधून खाली उतरविले आणि नंतर ते पसार झाले. तिसर्‍या घटनेत एका आमदाराने आपल्या अंगरक्षकाला एका हॉटेलमध्ये काम असल्याचे सांगत त्याला बाहेर थांबविले आणि दुसर्‍या गेटमधून ते निघून गेले, असेही या पोलिस अधिकार्‍याने सांगितले.

  • सुरत गाठण्यासाठी वेगवेगळी कारणे
  • कार्यकर्त्यांच्या डोळ्यांतही धूळ फेक
  • पोलिस अधिकार्‍याची माहिती

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news