पक्षातून घाण निघून गेली ; आदित्य ठाकरे | पुढारी

पक्षातून घाण निघून गेली ; आदित्य ठाकरे

मुंबई : पुढारी वृत्तसेवा :  पक्षातून घाण निघून गेली. जे गेले ते आपले कधीच नव्हते. बाळासाहेब आणि शिवसेनेचे नाव घ्यायचा त्यांचा प्रयत्न आहे. पण, त्यांची लायकी नाही, अशा शब्दांत पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांचा समाचार घेतला. शनिवारी हाजी अली येथील लाला लजपतराय महाविद्यालयाच्या सभागृहात घेतलेल्या शिवसेना पदाधिकार्‍यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.

आदित्य ठाकरे म्हणाले, ज्यांना मित्र मानायचो त्यांनीच दगाफटका केला. चांदिवलीचे आमदार दिलीपमामा लांडे यांनी तर काही दिवसांपूर्वी माझा हात पकडून मला मिठी मारली आणि रडत ते म्हणाले, मी तुम्हाला कधीही सोडणार नाही. ते प्रत्येक आठवड्याला माझ्या कार्यालयात यायचे. त्यांनी सांगितलेले कोणतेही काम मी केलेले नाही, हे दाखवून द्यावे. त्यांच्या बरोबरच मंत्री सांदिपान भुमरे यांनी सांगितलेली कामेही पूर्ण केली आहेत.

आमदार प्रकाश आबिटकर तर खूप जवळचे होते. ही माणसे अचानक निघून जातात आणि समोरून बोलतात तेव्हा वाटते की आपले काय चुकले, अशा भावनाही आदित्य ठाकरे यांनी यावेळी व्यक्‍त केल्या.

काहीजण मी पुन्हा येईन म्हणायचे, वर्षा बंगला सोडताना भिंतीवर कुणी लिहूनही ठेवायचे, असे सांगत आदित्य ठाकरे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चिमटा काढला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वर्षा बंगल्याचा मोह कधीच नव्हता. अनेक मंत्री मंत्रिपद गेले तरी बंगला सोडायला तयार नसतात.

फेसबुक लाईव्ह सुरू व्हायच्या आत उद्धव साहेबांनी सांगितले की, आदित्य बॅगा बांधा, आपण निघतोय. असा मुख्यमंत्री कुणाला मिळणार, असेही आदित्य म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी मोह सोडला. पण जिद्द सोडलेली नाही. शिवसैनिकांच्या बळावर आपण नव्याने संघटना उभारू आणि तिला वैभव प्राप्‍त करून देऊ, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

Back to top button