

मुंबई ः पुढारी वृत्तसेवा : मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या जुलै सत्राच्या विविध अभ्यासक्रमाचे प्रवेश आजपासून (25 जून) सुरू होत असून हे प्रवेश 30 जुलैपर्यंत चालू असणार आहेत. पदवीस्तरावरील प्रथम वर्ष बीए, बीकॉम, बीकॉम अकाउंट्स अॅण्ड फायनान्स, बीएस्सी आयटी,बीएस्सी कॉम्प्युटर सायन्स हे अभ्यासक्रम व पदव्युत्तर स्तरावरील प्रथम वर्ष एमए (इतिहास, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, भूगोल, मराठी,हिंदी, इंग्रजी), एमए शिक्षणशास्त्र, एमकॉम, एमएस्सी गणित, एमएस्सी आयटी, एमएस्सी कॉम्प्युटर सायन्स व पदव्युत्तर पदविका पीजी डीएफएम या अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरू होत असून प्रवेश अर्ज भरण्याची शेवटची मुदत 30 जुलैपर्यंत आहे.
प्रवेश ऑनलाईन असून https://old.mu.ac.in/distance-open-learning/ या संकेतस्थळावरुन अर्ज भरावेत. गतवर्षी 21 अभ्यासक्रमामध्ये 64 हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. यावर्षी प्रवेश लवकर सुरू झाल्याने प्रवेश वाढतील, असा विश्वास आयडॉलच्या माध्यमातून व्यक्त केला आहे.
बी.ए मानसशास्त्र विषय अभ्यासक्रम सुरू
बी.ए मध्ये मानसशास्त्र विषयाला विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मानसशास्त्राचे सहा पेपर सुरू करण्यात येत आहे. एआयसीटीईने आयडॉलला एमएमएस-एमबीए व एमसीए या अभ्यासक्रमाला दूरस्थ माध्यमातून सुरू करण्यास परवानगी दिली आहे.यानुसार एमएमएस-एमबीए व एमसीए या अभ्यासक्रमासाठी आयडॉल लवकरच प्रवेश परीक्षा घेणार आहे. एआयसीटीईने आयडॉलला एमएमएस-एमबीए साठी 720 जागा तर एमसीएसाठी 2 हजार जागांना मान्यता दिली आहे. याला यूजीसीची मान्यता मिळाल्यानंतर त्याची प्रवेश परीक्षा घेण्यात येईल.
आयडॉलचे चर्चगेट, ठाणे, कल्याण, रत्नागिरी व सावंतवाडी येथे विभागीय केंद्रे असून याठिकाणी प्रवेशासंबंधी मार्गदर्शन व अध्ययन साहित्याचे वितरण होणार आहे.पालघर येथेही लवकरच उपलब्ध होणार आहे.
बारावी उत्तीर्ण झालेल्या पण ज्यांना नियमित महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळाला नाही व ज्यांना उच्च शिक्षण घेण्याची इच्छा असणार्या अनेक विद्यार्थ्यांना आयडॉलने शिक्षणाची एक संधी उपलब्ध करून दिली आहे.
– डॉ. प्रकाश महानवर, संचालक, आयडॉल