एमएचटी सीईटी देणार्‍या विद्यार्थ्यांना अर्जामध्ये सुधारणा करण्याची संधी | पुढारी

एमएचटी सीईटी देणार्‍या विद्यार्थ्यांना अर्जामध्ये सुधारणा करण्याची संधी

मुंबई: पुढारी वृत्तसेवा :  शैक्षणिक वर्ष 2022-23 साठी एमएचटी सीईटी परीक्षेसाठी नोंदणी केल ल्या विद्यार्थ्यांना अर्जामध्ये सुधारणा करण्यासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षांतर्गत विशेष बाब म्हणून एक संधी देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना 23 ते 30 जूनदरम्यान आपल्या स्वत:च्या लॉगिनमधून अर्जामध्ये सुधारणा करता येणार आहे.

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातील तंत्रशिक्षण विभागांतर्गत असलेल्या विविध पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षांचे आयोजन करण्यात आलेले आहे. तंत्रशिक्षण विभागांतर्गत असलेल्या एमएचटी सीईटी 2022 या सामाईक प्रवेश परीक्षेसाठी 6 लाख 6 हजार 142 उमेदवारांनी नोंदणी प्रक्रिया परीक्षा शुल्क भरून पूर्ण केलेली आहे. काही उमेदवारांकडून अर्ज भरताना अनवधानाने विविध प्रकारच्या चुका झाल्या आहेत.

या चुका दुरुस्त करण्याबाबत विद्यार्थ्यांनी सीईटी सेलकडे दूरध्वनी, ईमेलद्वारे व प्रत्यक्ष कार्यालयात भेट देऊन विनंती केली होती. याची दखल घेत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचा विचार करून त्यांनी ऑनलाईन पद्धतीने म्हणजे (पीसीएम व पीसीबी बदल) भरलेल्या अर्जात बदल करण्यासाठी एक विशेष बाब म्हणून संधी देण्याचा निर्णय सीईटी सेलकडून घेण्यात आला आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना त्यांचे नाव, जन्मतारीख, छायाचित्र, सही, ग्रुप बदल करता येणार आहे. ही सुधारणा विद्यार्थ्यांना 23 ते 30 जूनदरम्यान स्वत:च्या लॉगिनमधून करायची असल्याची माहिती राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाचे आयुक्त रवींद्र जगताप यांनी दिली.

Back to top button