शिंदे यांनी दिलेल्या पत्राची सत्यता तपासणार : उपाध्यक्ष | पुढारी

शिंदे यांनी दिलेल्या पत्राची सत्यता तपासणार : उपाध्यक्ष

मुंबई : पुढारी वृत्तसेवा :  एकनाथ शिंदे यांनी बुधवारी 34 आमदारांच्या सहीचे जे पत्र दिले आहे, त्यावर आमदारांनी केलेल्या सह्या खर्‍या आहेत का, ते आपण तपासणार असल्याचे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी स्पष्ट केले आहे. सध्या तरी शिवसेना गटनेते अजय चौधरी आणि मुख्य प्रतोद हे सुनील प्रभूच असल्याचे झिरवाळ यांनी सांगितले.

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटी येथे गेल्यानंतर शिवसेनेचे गटनेते आपणच असल्याचा दावा एका पत्राद्वारे केला आहे. शिवसेना मुख्य प्रतोदपदावरून सुनील प्रभू यांची हकालपट्टी करत त्या ठिकाणी भरत गोगावले यांची शिंदे यांनी नियुक्‍ती केली आहे.
याबाबत बोलताना नरहरी झिरवाळ म्हणाले, एकनाथ शिंदे यांच्या गटाने मला पाठवलेल्या ठरावाच्या पत्रावर 34 आमदारांच्या सह्या आहेत. परंतु शिवसेनेच्या आमदारांची संख्या स्थिर नाही. त्यामुळे हे पत्र जरी खरे असले तरी त्याची सत्यता मला तपासावी लागेल.

ते पुढे म्हणाले, आमदार नितीन देशमुख यांनी दावा केला आहे की, मी इंग्रजीत स्वाक्षरी करतो. परंतु ठराव पत्रावर मराठीत स्वाक्षरी आहे. या ठरावावर उपस्थित सर्व आमदारांनी स्वाक्षरी केल्याचा दावा या पत्रात करण्यात आला आहे. परंतु त्या ठरावावर माझी सही नसल्याचे
नितीन देशमुख यांनी स्पष्ट केले आहे. इतर आमदारांचेही असेच काही आहे का तेही तपासून पाहावे लागणार आहे. मुख्य व्हिपची नियुक्‍ती तेव्हाच होऊ शकते जेव्हा तो पक्षाचा गटनेता असेल. सध्या अन्य नेत्यांचा गट अस्तित्वात आहे की नाही हे स्पष्ट नाही. नियम पुस्तकनुसार फक्‍त पक्षाचे अध्यक्ष गटनेते नियुक्‍त करू शकतात.

मुख्य व्हिपच्या नियुक्‍तीसाठी सर्व आमदारांनी उपस्थित राहणे आवश्यक नाही. उद्धव ठाकरे यांनी कायद्यानुसार त्यांच्या पक्षाचा नवीन मुख्य व्हिप नेमण्यासाठी मला पत्र दिले आहे. म्हणून मी त्यांचा विचार केला. सध्या तरी आमदार अजय चौधरी गटनेते आणि सुनील प्रभू हे मुख्य प्रतोद आहेत.

आमदारांना एकनाथ शिंदे यांनी पाठिंबा देण्यास भाग पाडले जात असल्याच्या चर्चांवर उपाध्यक्ष म्हणाले की, आमदारांना गुवाहाटीत राहण्यास भाग पाडले जात असल्याचा कोणताही पुरावा आमच्याकडे नाही. मात्र स्थानिक पोलिस ठाण्यांमध्ये तक्रारी आहेत. त्यांची चौकशी केली जाईल. त्यांना बळजबरीने नेले आहे का, यावर मी भाष्य करू शकत नाही.

Back to top button