

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : मुंबई शहराला पाणीपुरवठा करणार्या तलावांतील पाण्याची पातळी खालावत असून सध्या तलावात अवघा 9.76 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. हा साठा जेमतेम महिनाभर पुरेल इतका असल्यामुळे शहरातील पाणीकपात टाळण्यासाठी मुंबई महापालिका पावसाची चातकाप्रमाणे वाट बघत आहे. पण पाऊस लांबला तर, पाणीकपातीची शिवाय दुसरा पर्याय नसल्याचे जल अभियंता विभागातील एका वरिष्ठ अधिकार्याने स्पष्ट केले.
मुंबई शहराला पाणीपुरवठा करणार्या तलाव क्षेत्रात पाऊस दाखल झाला असला तरी, पावसाचा फारसा जोर नसल्यामुळे पाण्याची पातळीत दिवसेंदिवस घट होत आहे. अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार व तुळसी या सात तलावांत 14 लाख 47 हजार 363 दशलक्ष लिटर पाणी साठवण्याची क्षमता आहे.
सध्या या तलावांमध्ये 1 लाख 41 हजार दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा शिल्लक आहे. 2021 च्या तुलनेत हा पाणीसाठा सुमारे पाच ते सहा टक्क्यांनी कमी आहे. त्यामुळे त्या आठवड्याभरात तलाव क्षेत्रात समाधानकारक पाऊस होणे आवश्यक आहे. अन्यथा पाणीकपातीचा निर्णय घ्यावा लागेल, असे जल अभियंता विभागातील एका अधिकार्याने सांगितले.
सातही तलाव क्षेत्रात आतापर्यंत 43 ते 273 मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे. नॅशनल पार्कमध्ये असलेल्या बिहार व तुळशी तलावात अनुक्रमे 244 मिनी व 273 मिमी इतका पाऊस झाला आहे. शहराला सर्वाधिक दररोज 1850 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करणार्या भातसा तलावाच्या पाणलोट क्षेत्रात 170 मिमी पाऊस झाला आहे.
ठाणे जिल्ह्यातील मोडक सागर व तानसा तलाव क्षेत्रात अनुक्रमे 102 मिमी ते 173 मिमी पाऊस झाला आहे. 2021 मध्ये
तुळशी तलावात सर्वाधिक 1414 मिमी पाऊस झाला होता. यावेळी या तलावात गेल्या वर्षीच्या तुलनेत दहा टक्केही पाऊस झाला नसल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.