संजय राऊत यांचे नवे ट्वीट , "घरचे दरवाजे ..." | पुढारी

संजय राऊत यांचे नवे ट्वीट , "घरचे दरवाजे ..."

पुढारी ऑनलाईन डेस्‍क :
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्‍या बंडामुळे पक्षाला मोठा हादरा बसला आहे. बुधवारी सायंकाळी मुख्‍यमंत्री ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला आणि त्‍यानंतर वर्षा बंगला सोडला. आज सकाळपासून शिवसेनेकडून बंडखोरांची समजूत काढण्‍यासाठी प्रयत्‍न सुरु झाले आहेत. आमदारांची इच्‍छा असेल तर आम्‍ही महाविकास आघाडीतून बाहेर पडायला तयार आहोत, असे विधान करत संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे गटाची समजूत काढण्‍याचा प्रयत्‍न केला. यानंतर त्‍यांनी पुन्‍हा  ट्वीट करत चर्चेतून मार्ग निघू शकतो, असे म्‍हटलं आहे.

संजय राऊत यांनी आपल्‍या ट्वीटमध्‍ये म्‍हटले आहे की, चर्चेतून मार्ग निघू शकतो.चर्चा होऊ शकते.घरचे दरवाजे उघडे आहेत. का उगाच वण वण भटकताय? असा सवाल करत गुलामी पत्करण्यापेक्षा स्वाभिमानाने निर्णय घेऊ, असे आवाहन त्‍यांनी बंडखोर आमदारांना ट्वीटच्‍या माध्‍यमातून केला आहे.

महाविकास आघाडीतून बाहेर पडायला शिवसेना तयार

महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याच्या एकनाथ शिंदेंच्या मागणीच्या विचार करु. शिंदे गटातील आमदारांनी २४ तासांत परत यावे, असे आवाहन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज दुपारी पत्रकार परिषदेत केले. राऊत म्‍हणाले की, शिवसेनेच्या आमदारांना गुलाम बनविण्याचा भाजपकडून प्रयत्न सुरू आहे. राज्यातील राजकीय पेच प्रसंगावार लवकरच मार्ग निघेल. लवकरच मुख्यमंत्री वर्षा निवासस्थानावर परतील, असा विश्वास राऊत यांनी यावेळी व्यक्त केला. शिंदे गटातील २१ आमदार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याचे सांगून बहुमत सिद्ध करण्याएवढा आकडा आमच्याकडे असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला.

दरम्यान, स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळण्यासाठी शिवसेनेच्या ३७ आमदारांचे आवश्यक असलेले संख्याबळ एकनाथ शिंदे यांनी गाठले आहे. शिवसेनेचे ३७ आणि ९ अपक्ष आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटी येथील रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये आहेत. त्यामुळे आता एकनाथ शिंदे कोणते पाऊल उचलतात याबाबत उत्सुकता आहे. ते स्वतंत्र गट स्थापन करण्यासाठी आवश्यक असलेले आमदार आपल्यासोबत असून आम्हाला शिवसेनेचा गट म्हणून मान्यता देण्याची मागणी शिंदे करू शकतात.

Back to top button