मुंबई : रंगलेल्या डावात फडणवीसांच्या हाती ‘एक्का’

मुंबई : रंगलेल्या डावात फडणवीसांच्या हाती ‘एक्का’
Published on: 
Updated on: 

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : विधान परिषद निवडणुकीत भाजपने पाच जागा जिंकून घडवलेला चमत्कार आणि त्यातून सावरण्यापूर्वीच सत्तारूढ महाविकास आघाडीला बसू लागलेले राजकीय भूकंपाचे हादरे पाहता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एकाचवेळी शरद पवारांना नामोहरम केले आणि दुसरीकडे शिवसेनेला गारद करण्यासाठी शिवसेनेचाच 'एक्का' वापरला.

राज्यसभा निवडणुकीत तीन पैकी तीन उमेदवार भाजपने निवडून आणले. परिषदेला चार जागा निवडून आणण्याइतकीच मतांची बेगमी भाजपकडे असताना फडणवीसांनी पाचवा उमेदवार उभा केला. तेव्हाच खरे तर महाविकास आघाडीचे धाबे दणाणले होते. कारण हा उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजपला तब्बल 17 जादा मते लागणार होती. ती मिळवायची म्हणजे आघाडीला टेकू देणार्‍या अपक्ष आणि छोटे पक्ष यांना आपल्याकडे वळवण्याशिवाय भाजपसमोर पर्याय नाही, हा सरधोपट अंदाज आघाडीच्या धुरिणांनी लावला. त्यानुसार राष्ट्रवादीने आपले दोन्ही उमेदवार निवडून येतील याची खबरदारी घेतली. शिवसेनेनेही आपल्या दोन उमेदवारांचा विजय निश्चित केला. काँग्रेसने मुळात आपल्या ताकदीनुसार एकच उमेदवार देणे अपेक्षित होते.

या पहिल्याच उमेदवाराला जिंकण्यासाठी काँग्रेसला आठ मते 'भिक्षांदेही' करून मिळवावी लागणार होती. असे असताना चंद्रकांत हंडोरे यांच्या जोडीला काँग्रेसने भाई जगताप यांना उतरवले. परिणामी जादा मते मिळवण्याचे आव्हान आणखी अवघड झाले. यात राष्ट्रवादीकडे देण्यासाठी जादा मते नव्हती. पण प्रत्यक्ष निवडणुकीत राष्ट्रवादीने सहा जादा मते मिळवली. म्हणजेच काँग्रेसला काडीचीही मदत केली नाही. दुसरीकडे आपल्याकडची तीन जादा मते काँग्रेसला देऊ, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले. हे सारे घडत असताना फडणवीस यांचे डावपेच अत्यंत शांतपणे पण तितक्याच वेगाने सुरू होते.

शिवसेनेचे तीन आमदार फुटले. शिवसेनेला पाठिंबा देणारे आठ अपक्षदेखील फुटले आणि हे सारे भाजपला जाऊन मिळाले. पत्त्यांच्या रंगलेल्या डावात एक्का खेळावा तसा एक्का फडणवीस खेळत होते. हे कुणाच्याही लक्षात आले नाही. सेनेचे तीन आमदार फुटण्यामागे खुद्द एकनाथ शिंदे होते आणि त्यामागे गुरुमंत्र होता तो फडणवीस यांचा. शिंदे हा सेनेतला धुमसता 'धर्मवीर'असल्याचे फडणवीस यांनी लक्षात ठेवले. फडणवीस यांच्या आधीच्या राजवटीत एकनाथ शिंदे मंत्री होते.

तेव्हाही त्यांचे सेनेतून बाहेर पडण्याचे निरोप फडणवीस यांच्याकडे पोहोचले होते. प्रत्यक्षात तसे घडू शकले नाही. याची नोंद फडणवीस यांनी आपल्या डायरीत करून ठेवलेली असावी. त्यामुळे परिषदेचा आखाडा आखला गेला आणि शिवसेना काँग्रेसला मदत करणार हे लक्षात येताच फडणवीस यांनी आपल्या डावातला एक्का बाहेर काढला.

राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसने सेनेला दगा दिला म्हणून परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसला मदत करू नये, अशी भूमिका एकनाथ शिंदे यांनी घेतली. शिवसेना नेत्यांशी मतभेद पत्करत त्यांनी काँग्रेसला मदत करण्याचा प्रस्ताव हाणून पाडला. खरे तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विरोधात त्यांनी पुकारलेल्या बंडाची ही सुरुवात होती. मात्र, एक फडणवीस वगळता ते कुणाच्याही लक्षात आले नाही.

सोमवारी विधान परिषदेचे निकाल लागल्यानंतर लढाई एकदाची संपली, असे सरकारला वाटत असताना फडणवीस यांनी अत्यंत चाणाक्षपणे पुढच्या लढाईचे संकेत दिले. तेदेखील ओळखण्यात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यासह सारे धुरंधर नेते कमी पडल्याचे दिसते. विधान परिषदेच्या पाचव्या जागेवर झालेला भाजपचा विजय हा महाराष्ट्रातील नव्या परिवर्तनाची नांदी आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी सरकारविरोधातील असंतोष बाहेर आला आहे.

आमचा संघर्ष यापुढेही सुरूच राहील. राज्यात लोकाभिमुख सरकार सत्तेवर आणल्यानंतरच हा संघर्ष थांबेल, असे फडणवीस म्हणाले होते. निकालाच्या दुसर्‍या दिवशीची म्हणजे मंगळवारची पहाट उजाडली आणि शिवसेनेला बंडाचे धक्के बसू लागले. हा राजकीय भूकंप आता सरकार उलथवणार ही शक्यता अटळ भासू लागली आणि तेव्हा कुठे फडणवीस यांनी आदल्या रात्री दिलेल्या परिवर्तनाच्या नांदीचा अर्थ सगळ्यांनाच उमगला.

शिवसेनेला सोबत घेऊन महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करणार्‍या शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडेच गृहखाते असताना फडणवीस यांनी शिवसेनेला म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या पक्षालाच खिंडार पाडले आणि गृहखात्याला गंधवार्ताही लागू दिली नाही, हे पवारांचे फार मोठे अपयश मानले जाते. कदाचित फडणवीस यांची ही ताकद पवार जाणून असावेत. पाच वर्षांची मुख्यमंत्रिपदाची टर्म पूर्ण झाल्यावर फडणवीस हेच पुन्हा मुख्यमंत्री होतील, अशी राजकीय स्थिती 2019 मध्ये होती. पण फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री बनले तर राष्ट्रवादीसाठी धोकादायक ठरतील, हे पवारांसारख्या चाणाक्ष नेत्याने ओळखले. त्यामुळे 2019 मध्ये शिवसेनेला हाताशी धरून त्यांनी फडणवीस यांना मुख्यमंत्री होऊ दिले नाही. परंतु गेल्या अडीच वर्षांत फडणवीस यांनी पवार आणि आघाडी सरकारला मेटाकुटीला आणले.

1999 मध्ये आमदार म्हणून विधानसभेत पहिले पाऊल टाकणार्‍या फडणवीस यांचा राजकारणातील अनुभव आणि आवाका पवारांच्या तुलनेत काहीच नव्हता. पण 2019 चे मुख्यमंत्रिपद हे पवार यांच्या खेळीने हुकले. ती जखम फडणवीस विसरलेले नाहीत. पवारांकडे राज्यातील सत्ता असताना त्यांना राज्यसभा, विधान परिषद निवडणुकीत त्यांनी धूळ चारली. देशाच्या राजकारणात पवारांचा दबदबा आहे. राज्यातील सर्वपक्षीय नेते हे पवारांशी संघर्ष करायला तयार होत नाहीत. भाजपचे राज्यातील अनेक वरिष्ठ नेते त्यांच्या मांडीला मांडी लावून त्यांचे गुणगान गातात; तर फडणवीस मात्र थेट पवारांना आव्हान देतात.

महाराष्ट्राच्या राजकारणात देवेंद्र फडणवीस हे व्यक्तिमत्त्व तसे ज्येष्ठ वगैरे नव्हे. त्यातही शरद पवारांच्या समोर तर फडणवीस हे अगदीच नवखे आहेत. वयाच्या आणि अनुभवाच्याच भाषेत सांगायचे तर पवारांच्या नातवांचीही लग्ने झाली. फडणवीस यांची मुलगी अजून खूपच लहान आहे. इतके महद अंतर फडणवीस आणि पवार यांच्यात स्पष्ट दिसते. परंतु, पवारांसारख्या तेल लावलेल्या पैलवानाला एकापाठोपाठ एक धक्के देण्याचे कसब फडणवीस यांनी कुठे आणि कसे कमावले याचा अभ्यास करावा अशीच एकूण स्थिती आहे.

क्रिकेटच्या मैदानात किंवा कुस्त्यांच्या आखाड्यात खेळ पाहताना डावपेच, व्यूहरचना आणि ताकद अशा तिहेरी नजरेतून आनंद घ्यायचा असतो. राजकारण तर महाराष्ट्राचा आवडता खेळ. या खेळाचे नवे डावपेच टाकत पवारांसह भल्या भल्या पैलवानांना फडणवीस चितपट करीत चालले आहेत आणि या खेळाने महाराष्ट्राचे राजकारण एकदम फ्रेश झालेले दिसते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news