शहर बस थांबे बनलेत तळीरामांचे अड्डे; तिकीट घराचा होतोय मुतारीसारखा वापर | पुढारी

शहर बस थांबे बनलेत तळीरामांचे अड्डे; तिकीट घराचा होतोय मुतारीसारखा वापर

सूर्यकांत वरकड

नगर ः शहर बस सेवा एका खासगी कंपनीला चालविण्यासाठी देण्यात आली आहे. त्यात शहरात 28 बस थांबे आहेत. मात्र, सर्व बस थांबे आता तळीरामांचे अड्डे बनले असून, तिकीट घराचा मुतारीसाठी वापर होत आहे. देखभाल दुरूस्ती करणार्‍या कंपनीने त्याकडे कानाडोळा केला आहे. शहरातील नागरिकांना प्रवास सुलभ व्हावा या दृष्टीने शहरात शहर बस सेवा सुरू करण्यात आली. त्यासाठी शहरात 28 ठिकाणी थांबे निर्माण करण्यात आले. शहर बस सेवा ही एका खासगी कंपनीला चालविण्यासाठी देण्यात आली आहे.

त्याचबरोबर शहर बस चालविणार्‍या खासगी कंपनीने जागो-जागी तिकीट घर उभारले आहे. तर, शहर बस थांब्यांची देखलभाल दुरूस्ती औरंगाबाद येथील खासगी उपेंद्र पब्लिसिटी या खासगी कंपनीला देली आहे. शहरातील सर्व बस थांब्याची देखभाल दुरूस्ती करणे ही त्या कंपनीची जबाबदारी आहे. त्याबद्दल्यात ती कंपनी विविध जाहिरातदारांकडून पैसे आकारते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ती कंपनी बस थांब्यांचा फक्त जाहीरात करण्यासाठी वापर करीत आहे. तेथील देखभाल दुरूस्तीकडे कंपनीचे साफ दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. अनेक बस थांब्यांचा नागरिक वापर करीत नाही. कारण ते बस थांबे वापरण्या योग्य राहिलेले नाहीत. नागरिक रस्त्यावर थांबूनच बसमध्ये बसतात आणि उतरल्यानंतरही रस्त्यावरच उभे राहतात, अशी परिस्थिती आहे.

बस थांब्यावर सर्वत्र कचरा, गुटख्याची पाकिटे आणि दारूच्या बाटल्या पडलेल्या आहेत. काही बस थांब्यांचा अपवाद वगळता सर्वच बस थांब्याची अशी अवस्था आहे. तर, शहर बस चालविण्यासाठी दिलेल्या कंपनीने दोन ते तीन ठिकाणी तिकीट घर उभारले आहेत. त्या तिकीट घराचा आता मुतारीसाठी वापर होत आहे. दिल्लीगेट येथील तिकीट घराची दैयनीय अवस्था झाली आहे.

गरज 30 बसची, धावतात 15

शहरात 192 शाळा, सात महाविद्यालये, एमआयडीसी, कापड बाजार, सावेडी उपनगरात वेगाने निर्माण होणारी बाजारपेठ आणि त्यात दररोज किमान 17 हजार प्रवासी बस व रिक्षाने येजा-करतात. त्यामुळे शहराला किमान 30 बसची आवश्यकता आहे. मात्र, संबंधित खासगी कंपनीकडून केवळ 15 बसची व्यवस्था करण्यात आली आहे.

शहरातील बस थांब्याचे देखभाल दुरूस्ती करण्याचे काम औरंगाबाद येथील कंपनीला दिलेले आहे. मात्र, नागरिक बस थांब्याचा वापर करीत नाहीत. बस थांब्यांची साफसफाई करण्यासंदर्भात कंपनीला सूचना देण्यात येतील.
परिमल निकम, अभियंता मनपा

 

Back to top button