पहिली इलेक्ट्रिक एसी डबल डेकर बस येणार | पुढारी

पहिली इलेक्ट्रिक एसी डबल डेकर बस येणार

मुंबई : पुढारी वृत्तसेवा :  मुंबईकरांना लवकरच इलेक्ट्रिक एसी डबल डेकर बसमधून प्रवास करता येणार आहे. येत्या 7 ऑगस्ट रोजी म्हणजेच बेस्टच्या स्थापना दिनानिमित्त पहिली एसी इलेक्ट्रिक बससेवेचे लोकार्पण केले जाणार आहे. मुंबईकरांसह देशी आणि विदेशी पर्यटकांचे आकर्षण असलेल्या डबलडेकर बस पुन्हा सेवेत येणार आहेत.

सध्या बेस्टच्या ताफ्यात फक्‍त 41 डबल डेकर आहेत. प्रवाशांची डबल डेकरला असलेली पसंती पाहून बेस्टने आपल्या ताफ्यात 900 एसी इलेक्ट्रिक डबल डेकर समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची निविदा प्रक्रिया देखील राबविण्यात आली आहे. त्यानुसार यावर्षी डिसेंबर अखेर 225, मार्च 2023 पर्यंत 225 आणि जून 2023 पर्यंत 450 बस बेस्टकडे येणार आहेत.

बेस्ट उपक्रमाने या बसकरिता महत्वाचे 55 मार्ग निवडले आहेत.  सीएसएमटी ते बॅकबे आगार हा डबल डेकर बसचा सर्वात लोकप्रिय मार्ग आहे. डबल डेकर बस एकावेळी 100 हून अधिक प्रवाशांना सेवा देते. त्यामुळे आगामी काळात मुंबईत इलेक्ट्रिक डबल डेकर एसी बस धावताना दिसणार आहेत.

Back to top button