धारावीतील शेकडो वारकर्‍यांचे पंढरपूरकडे प्रस्थान | पुढारी

धारावीतील शेकडो वारकर्‍यांचे पंढरपूरकडे प्रस्थान

धारावी, (मुंबई) : पुढारी वृत्तसेवा :  धारावीतील शेकडो वारकर्‍यांनी रविवारी भर पावसात ज्ञानोबा माऊलीचा जयघोष करत पंढरपूरकडे प्रस्थान केले. धारावीत दरवर्षी कोणत्याही निमंत्रणाशिवाय वारीचा सोहळा मोठ्या थाटात साजरा होतो. मात्र रविवारी संततधार कोसळणार्‍या पावसामुळे दिंडी निघण्याच्या वेळेत थोडासा बदल करण्यात आल्यामुळे आयोजकांसह वारकर्‍यांची चांगलीच धावपळ झाल्याचे दिसून आले.

धारावी नवी चाळ येथील तरुणांनी शिव पंच मंदिरातून निघालेल्या पायी दिंडीचे जोरदार स्वागत करत शिव मंदिर परिसरात मंडप उभारून वारकर्‍यांच्या न्याहरीची व्यवस्था केली होती. दिंडी सुरू होण्यापूर्वी वारकर्‍यांनी नवी चाळ शिव मंदिरात परंपरागत धार्मिक विधी आटोपून टाळ-मृदंगाच्या तालावर ठेका धरत दिंडीला सुरुवात केली.

संत कक्कया समाज पायी दिंडी मंडळाच्या वतीने पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले. धारावीतून निघालेली दिंडी कुर्ल्यापर्यंत पायी जाणार असून कुर्ला ते आळंदी ट्रकने प्रवास करणार आहेत. आळंदीला संतश्रेष्ठ ज्ञानेेशर माऊली पालखी सोहळ्यासाठी तीन दिवसांचा मुक्काम असून तीन दिवसांचा सप्ताह झाल्यानंतर दिंडी आळंदी ते पंढरपूर असा 16 दिवसांचा प्रवास पायी करणार आहे.

Back to top button