संरक्षित वनाचे क्षेत्र वाढतय, वन्यजीवांचा भटकंतीचाही मार्ग होताेय सुरक्षित : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे | पुढारी

संरक्षित वनाचे क्षेत्र वाढतय, वन्यजीवांचा भटकंतीचाही मार्ग होताेय सुरक्षित : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : राज्यात मागील अडीच वर्षात १७५०.६३ चौ.कि.मीचे २३ नवीन संवर्धन राखीव क्षेत्र ,  ६४७.१२९४ चौ.कि.मी ची ५ नवीन अभयारण्ये आणि  ८५.८९ हेक्टरच्या ४ जैवविविधता वारसा स्थळांची निर्मिती करण्यात आली आहे. ही हरित महाराष्ट्राची ध्येयवादी वाटचाल दर्शवित आहे. या माध्यमातून राज्याच्या संरक्षित वनाचे क्षेत्र वाढत असतानाच, वन्यजीवांचा भटकंतीचा मार्गही सुरक्षित होताना दिसत आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

शासनाने नेहमीच पर्यावरणस्नेही विकासाला प्राधान्य दिले असून, शाश्वत विकासाचा तो महत्वाचा आधार आहे. नव्याने निर्माण करण्यात आलेल्या २३ संवर्धन राखीव क्षेत्रांपैकी ९ संवर्धन राखीव क्षेत्रं आरक्षित करण्यात आली आहेत. उर्वरित संवर्धन राखीव क्षेत्र आरक्षित करण्याची कार्यवाही सध्या सुरु असल्याचेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.  .

मागील अडीच वर्षात राज्यात नवीन संवर्धन राखीव क्षेत्रे घोषित

कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी (२९.५३) जोर जांभळी (६५.११), आंबोली दोडामार्ग (५६.९२), विशाळगड (९२.९६), पन्हाळगड (७२.९०), मायणी पक्षी संवर्धन (८.६७), चंदगड (२२५.२४), गगनबावडा (१०४.३९), आजरा भुदरगड (२३८.३३),मसाई पठार (५.३४), नागपूर जिल्ह्यातील मुनिया (९६.०१),  मोगरकसा (१०३.९२), अमरावती जिल्ह्यातील महेंद्री (६७.८२), धुळे जिल्ह्यातील चिटबावरी (६६.०४), अलालदरी  (१००.५६), नाशिक जिल्ह्यातील कळवण (८४.१२), मुरागड (४२.८७), त्र्यंबकेश्वर (९६.९७), इगतपुरी (८८.५०), रायगड जिल्ह्यातील रायगड (४७.६२), रोहा (२७.३०), पुणे जिल्ह्यातील भोर ( २८.४४), सातारा जिल्ह्यातील दरे खुर्द (महादरे) (१.०७)  यांचा समावेश आहे. यातील तिलारी, जोर जांभळी, आंबोली दोडामार्ग, विशाळगड, पन्हाळगड,  मायणी, चंदगड, मुनिया आणि महेंद्री  ही ९ संवर्धन राखीव क्षेत्रं आरक्षित झाली आहेत, असेही त्‍यांनी सांगितले.

पाच अभयारण्ये

शासनाने चंद्रपूर जिल्ह्यातील कन्हारगाव (२६९.४० चौ.कि.मी), विस्तारीत अंधारी वन्यजीव अभयारण्य ( ७८.४०), जळगाव जिल्ह्यातील मुक्ताई भवानी (१२२.७४०), गडचिरोली जिल्ह्यातील कोलामार्का ( १७५.७२), बुलडाणा जिल्ह्यातील विस्तारीत लोणार वन्यजीव अभयारण्य ( .८६९४) अशी पाच अभयारण्ये याच कालावधीत घोषित केली आहेत.  यातील कन्हारगाव अभयारण्याची अधिसुचना निघाली असून उर्वरित अभयारण्याची अधिसूचना निर्गमित करण्याची कार्यवाही सुरु आहे.

जैवविविधता वारसा स्थळे

पुणे जिल्ह्यातील गणेशखिंड (३३.०१), धुळे जिल्ह्यातील लांडोरखोरी (४८.०८), कोल्हापूर जिल्ह्यातील बांबर्डे मायरेस्टिका (२.५९) आणि शिुस्टुरा हिरण्यकेशी ही चार जैवविविधता वारसा स्थळे मागील अडीच वर्षाच्या काळात घोषित करण्यात आली असून, या सर्वांची अधिसूचना निर्गमित झाली आहे.

रामसर दर्जा

लोणारला रामसर साईट दर्जा मिळाला असून, ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्याच्या रामसर दर्जाचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यात आला आहे.

Back to top button